दिवाळीच्या खरेदीसाठी ठाणेकरांची गर्दी; बाजारपेठांमध्ये ग्राहकांची एकच झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 12:17 AM2020-11-09T00:17:56+5:302020-11-09T00:18:10+5:30
सोशल डिस्टन्सिंगचे वाजले तीनतेरा
ठाणे : दिवाळीनिमित्त बाजारपेठेत खरेदी सुरू झाली असून शनिवारी, रविवारी ठाणेकरांनी खरेदीचा जोर वाढवला होता. यावेळी ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजवले.
सणासुदीचे दिवस सुरू झाले असून त्यानिमित्ताने ठाण्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कटलेली असताना दिवाळी लाभदायी ठरेल, अशी दुकानदारांना आशा आहे. ठाणेकरांनी १ नोव्हेंबरपासून थोडीथोडी खरेदी सुरू केली. शनिवारी-रविवारी सुटीचा मुहूर्त साधत ठाणेकर मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडले. त्यानिमित्ताने ठाण्यातील मुख्य बाजारपेठेसह गोखले रोड, राममारुती रोड तसेच पूर्वेतील कोपरी मार्केटदेखील कंदील, पणत्या, रांगोळ्यांनी सजले आहे. ठिकठिकाणी विक्री सुरू असून ग्रामीण भागातून पणत्या आणि कंदील विक्रीसाठी आले आहेत. राममारुती रोडवर हे विक्रेते प्रामुख्याने आहेत. आपल्या कुटुंबासह पोटापाण्यासाठी हे विक्रेते येथे दाखल झाले आहेत.
लहान मुलांना नवीन कपडे, उटणे, नवीन वस्तू, इलेक्ट्रॉनिक तोरण, कंदील, पणत्या, फराळाचे सामान, सजावटीचे साहित्य खरेदी करताना ठाणेकर दिसून आले. सकाळी १० नंतर खरेदीचा जोर वाढत गेला. दुपारी ऊन आल्यावर गर्दी ओसरली असली, तरी दुपारी ४-५ वाजल्यानंतर पुन्हा गर्दी झाली. त्यात वाहतूककोंडीचाही ठाणेकरांना सामना करावा लागला. मात्र, कोरोनाचा धोका कमी
होत असतानाच ठाण्यात नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजवले. कोरोनामुळे हातचे राखून ठाणेकरांकडून खरेदी केली
जात होती.