अन्नधान्य, किराणा खरेदीसाठी ठाणेकरांनी केली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:40 AM2021-04-06T04:40:07+5:302021-04-06T04:40:07+5:30
स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्यात सोमवार रात्रीपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, वाढती रुग्णसंख्या पाहता ...
स्नेहा पावसकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्यात सोमवार रात्रीपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, वाढती रुग्णसंख्या पाहता कधीही लॉकडाऊन होऊ शकेल, या विचाराने सामान्य ठाणेकर सोमवारी सकाळीच अन्नधान्य, किराणा सामान खरेदीसाठी घराबाहेर पडलेले दिसले. तर मार्केट, शॉपिंग प्लाझा या ठिकाणीही मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली.
मागच्या वर्षी याच महिन्यात कडक लॉकडाऊन होता. अगदी काही तासांसाठी तिही ठराविक भागातील दुकाने सुरू राहायची. त्यामुळे अन्नधान्य, खाण्याच्या वस्तूही विकत, प्रसंगी जास्त पैसे देऊन तरी मिळतात का, त्यासाठी ठिकठिकाणी फिरायला लागायचे. तिथे जाताना वाटेत पाेलीस अडवणूक करायचे. आणि इतके करूनही हवी असलेली वस्तू मिळायचीच असे नाही. कारण त्यादरम्यान सगळ्याचा तुटवडा होता. शॉपिंग प्लाझामध्ये जायचे म्हटले तर तासन् तास रांगेत उभे राहावे लागायचे. हे कटू अनुभव अनेकांनी घेतलेले आहेत. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना सरकारने कडक निर्बंध घातले आहेत, तर नागरिकांनी निर्बंधांचे पालन केले नाही तर कारवाई करण्याबरोबरच लॉकडाऊनचे संकेतही यापूर्वीच दिले आहेत. आणि दररोज वाढते रुग्ण पाहता कधीही लॉकडाऊन जाहिर होईल, अशी भीती आणि चर्चा ठाणेकरांमध्ये रविवारपासूनच होती. सरकार पहिले काही दिवस निर्बंध घालून पाहील आणि मग लॉकडाऊन लावेल, अशी भीती नागरिकांत दिसते आहे. आणि या भीतीमुळेच सोमवारी सकाळी सामान्य ठाणेकर किराणा वस्तू, खाद्यपदार्थ, भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. ठाणे मार्केट परिसर, शहरातील विविध शॉपिंग बाझार येथे सकाळपासून गर्दी झालेली पाहायला मिळाली. साठवण करण्याच्या दृष्टीने ठाणेकर सामान खरेदी करत होते. ‘लॉकडाऊन झाले तर मग कुठे धावपळ करायची, अशी चर्चा त्यांच्यामध्ये ऐकायला मिळत होती.