पावसाळ्यातील घामोळ्याने ठाणेकर हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:27 AM2021-07-04T04:27:01+5:302021-07-04T04:27:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पावसाने मागील १० दिवसांपासून दडी मारल्याने पुन्हा तापमानात वाढ झाली असून, शनिवारी ठाणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पावसाने मागील १० दिवसांपासून दडी मारल्याने पुन्हा तापमानात वाढ झाली असून, शनिवारी ठाणे शहरात ३६ अंश तापमानाची नोंद झाली. कमालीचा उकाडा वाढल्याने पुन्हा एसी, पंखे यांचा वापर वाढला आहे. पावसाळी सहलीचे बेत केलेल्यांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. यंदा पावसाळा लवकर सुरू झाल्याने कपाटातून काढलेल्या छत्र्या, रेनकोट यांची अडगळ वाटू लागली आहे.
पावसाने गेले किमान १० दिवस विश्रांती घेतल्याने ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांचे तापमान वाढले आहे. यंदा पावसाने सुरुवातीलाच जोर पकडल्याने हवेत छान गारवा आला होता. अनेकांनी बंदी झुगारून धबधबे, नद्या, ओढे येथे पावसाळी सहलीचा आनंद घेतला. काहींनी आजच्या शनिवारी व उद्याच्या रविवारी लोणावळा, कर्जत येथे भिजायला जाण्याचे प्लान केले होते. मात्र सध्या पडणाऱ्या चकचकीत उन्हामुळे त्यांना त्यांचे बेत रहित करावे लागले. हवेतील उष्मा वाढल्याने घरातच पंखे, एसी लावून बसण्याची वेळ आल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. जुलै महिना उजाडला तरी पावसाची चिन्हे दिसत नसल्याने सारेच बेचैन झाले आहेत. शहरात झालेली बेसुमार वृक्षतोड, वाढलेले काँक्रीटचे जंगल यांमुळे शहरांचे तापमान मागील काही वर्षांत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जूनमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पाऊस पडला होता. त्यानंतर हवामान खात्याने एक-दोन वेळा मुंबई व उपनगरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता; परंतु पावसाने हवामान खात्याला दरवर्षीप्रमाणे यंदाही तोंडघशी पाडले. शनिवारी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी शहरात ३६ अंश तापमानाची नोंद झाली. सर्वांत कमी तापमानाची नोंद सकाळी सहा वाजता २७ अंश सेल्सिअस इतकी झाली. पारा ३५ अंशांच्या पुढे गेल्याने व तब्बल पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ठाणे जिल्ह्यातील शहरांत लसदर्शन झाल्याने लसीकरण केंद्रांवर शनिवारी तुफान गर्दी होती. ज्येष्ठ नागरिक, महिला यांचे उन्हाच्या तडाख्यात लसीकरणाकरिता रांगेत उभे राहून हाल झाले. पावसापासून संरक्षण करण्याकरिता खरेदी केलेल्या छत्रीचा वापर अनेकांनी या रांगेत उन्हाचा सामना करण्यासाठी केला.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरीही पावसाने दडी मारल्याने हवालदिल झाले आहेत. सुरुवातीला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी भातशेतीची कामे सुरू केली. मात्र आता पाऊस गायब झाल्याने पिकाचे नुकसान होण्याची भीती त्यांना सतावत आहे.
...........
वाचली