ठाणेकरांनी अनुभवले २०० देशांतील चलनी नोटांचे अनोखे प्रदर्शन, आबालवृद्धांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:55 PM2019-12-14T12:55:23+5:302019-12-14T12:57:11+5:30
२०० देशांतील नोटा, नाणी, स्टॅम्प, झेंडा यांचे प्रदर्शन ठाणेकरांनी अनुभवले.
ठाणे : २०० देशांतील चलनी नोटांचे अनोखे प्रदर्शन आज ठाणेकरांना अनुभवता आले. एकाच छताखाली २०० देशांतील नोटा, नाणी, स्टॅम्प आणि त्या देशाचा झेंडा ठाणेकरांना पाहता आले. विशेष म्हणजे इंडोनेशियातील एका नोटेवर श्री गणेशाचे चित्र, मोरोक्को या देशाची जगातील आकाराने सर्वात लहान नोट, मॉण्टेसरी कोर्स ज्यांच्यामुळे प्रसिध्द झाला त्या मारिया मॉण्टेसरी यांचे छायाचित्र असलेली इटलीची नोट, एवरेस्ट शिखर काबीज केलेल्या सर एडमंड हिलरी यांचे छायाचित्र असलेली न्युझीलंड देशाची नोट अशा विविध नोटा या प्रदर्शनाचे आकर्षण ठरले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी अगदी अबालवृद्धांनी गर्दी केली होती.
टीजेएसबी सहकारी बँकेच्या वतीने शनिवारी सकाळपासून ठाण्यात २०० देशांतील चलनी नोटा व नाण्यांचे प्रदर्शन आयोजित केले होते.
या प्रदर्शनात ऐतिहासिक नोटांचा समावेश असून भारतासह विविध देशातील विविधरंगी, विविध आकारांच्या, विविध मुल्यांच्या, विविध आंतरराष्ट्रीय नेत्यांची छायचित्रे असलेल्या दुर्मिळ नोटा व नाटी ठाणेकरांना पाहता आली. विविध शाळांतील, महाविद्यालयातील विद्यार्थी, तसेच, ज्येष्ठ नागरिक, महहिला-पुरूष वर्ग हे प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. या नोटांचा छंद जोपासणारे छांदिष्ट बँक आॅफ महाराष्ट्रचे निवृत्त उपव्यवस्थापक संजय जोशी यांच्या संग्रही हा ठेवा आहे. भारतातील पोर्तुगीज, फ्रेंच व ब्रिटिश राजवटीतील दुर्मिळ नोट, झिंबाब्बे देशाने प्रस्तुत केलेली तसेच गिनीज बुक्स आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान मिळवणारी शंभर ट्रिलियन डॉलर चलनी नोट, अमिताभ घोष केवळ १४ दिवस रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते त्यांच्या सहीची एक दुर्मिळ नोट, वेस्ट इंडियन भुखंडातील गियाना देशातील पोस्टल स्टँम्पवर श्रीकृष्ण रंगपंचमी खेळत असल्याचे चित्र अशा अनेक प्रकारच्या वैविध्यपूर्ण नोटा यात होत्या. यावेळी पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी, टीजेएसबी सहकारी बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक अजित रानडे आणि विनायक नवरे, शाखा व्यवस्थापक अरुण देसाई उपस्थित होते.