ठाणेकरांना आणखी अडीच वर्षे पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:24 AM2019-11-12T00:24:20+5:302019-11-12T00:24:24+5:30

गेले काही महिने महापौर मीनाक्षी शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या वादावर पडदा पडल्याचे दिसत होते.

Thanekar faces another two and a half years of water scarcity | ठाणेकरांना आणखी अडीच वर्षे पाणीटंचाईची झळ

ठाणेकरांना आणखी अडीच वर्षे पाणीटंचाईची झळ

Next

ठाणे : गेले काही महिने महापौर मीनाक्षी शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या वादावर पडदा पडल्याचे दिसत होते. मात्र, सोमवारी झालेल्या महासभेत या दोघांमध्ये पुन्हा पाणीटंचाईच्या मुद्यावर चांगलीच खडाजंगी झाल्याचे दिसून आले. तसेच आयुक्तांनी ठाणे शहरातील पाण्याची समस्या सुटण्यासाठी आणखी दोन ते अडीच वर्षांचा कालावधी जाणार असल्याचे स्पष्ट केले.
आयुक्तांनी यावेळी पाणीसमस्या सोडविण्यासाठी कशा प्रकारे विविध योजनांवर काम केले जात आहे, याची माहिती सभागृहाला दिली. मात्र, केवळ तांत्रिक माहिती देऊन उपयोग होत नाही. प्रत्यक्षात काय काम करता, याची उत्तरे आधी द्या, असा सवाल करून महापौरांनी आयुक्तांना धारेवर धरल्याचे दिसून आले. मात्र, मी कोणत्याही प्रकारे तांत्रिक मुद्दे उपस्थित केले नाहीत. उलट, जी कामे सुरूआहेत, जी प्रस्तावित आहेत, ज्या कामांच्या निविदा काढल्या आहेत, त्याविषयी बोलत होतो असे सांगून आयुक्तांनी पुन्हा महापौरांच्या वक्तव्यावर पलटवार केला.
>पाणीसाठवण क्षमता कमी असल्यामुळे समस्या
सोमवारी महासभा सुरूहोताच, सर्वपक्षीय सदस्यांनी पाणीसमस्येला वाचा फोडली. त्यात पाणीपुरवठा विभागाकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने लोकप्रतिनिधी अधिक संतप्त झाले होते. अखेर, यावर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हस्तक्षेप करून शहराला मुबलक पाणीपुरवठा होत असून नियोजन कमी पडत असल्याचे सांगून यावर उपाययोजना सुरू असल्याचे स्पष्ट केले. मुबलक पाणी येत असताना साठवणुकीची क्षमता आपल्याकडे कमी असल्याचे सांगून त्यानुसार नव्याने जलकुंभ उभारण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, मागील चार वर्षांपूर्वी साठवणुकीचा दर २१ टक्के होता. तो आता २८ टक्कयांवर आला असून येत्या काळात तो ३३ टक्कयांवर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. घोडबंदर भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी त्याठिकाणी रिमॉडेलिंगची योजना सुरूअसून दीड ते दोन महिन्यांत या भागाची पाणीटंचाई दूर होणार असल्याचे सांगितले. जलकुंभांची २५ कोटींची कामे सुरूआहेत. घोडबंदरसाठी ५० कोटींची योजना सुरू आहे. तर कळवा, मुंब्रा आणि दिव्याची तहान भागविण्यासाठी २२० कोटींच्या रिमॉडेलिंगच्या योजनेला मान्यता दिली आहे. काही दिवसांत काम सुरूही होईल. जलकुंभात पाणी किती आहे, पाणी कमी आले, यासाठी फ्लाइंग मीटर आणि स्काडा यंत्रणा सक्षम केली असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुक्तांच्या उत्तरावर महापौरांची नाराजी : आयुक्तांनी दिलेल्या या उत्तरावर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. आपण केवळ तांत्रिक मुद्यांवरच चर्चा केल्याचा ठपका ठेवून प्रत्यक्षात काय कामे केली, याचा कुठेही ऊहापोह झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. अनधिकृत नळजोडण्यांबाबत काय करणार, विकासकांना ओसी मिळण्याआधीच नवीन वाहिन्या कशा टाकून दिल्या जातात, पाणीबिलांची वसुली वेळेवर का होत नाही, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना त्यावर उपाययोजना काय केली, गढूळ, दूषित पाणी काही भागांना येत असताना त्यावर उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे, पाच-पाच वर्षे सोसायट्यांना बिले आकारली जात नाहीत, मनुष्यबळाची कमतरता असताना त्यावर काहीच होताना दिसत नाहीत. असे अनेक महत्त्वाचे मुद्दे असून त्यावर तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली.

Web Title: Thanekar faces another two and a half years of water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.