‘लोकमत’ महामॅरेथॉननंतर ठाणेकर हाेतील फिट, नायर यांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 06:15 AM2022-11-28T06:15:33+5:302022-11-28T06:16:12+5:30
निवृत्त लेफ्टनंट कमांडर नायर यांचा विश्वास
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : निवृत्त लेफ्टनंट कमांडर, टेडेक्स स्पीकर, बेस्ट ऑथर अवॉर्ड २०२१ चे विजेते आणि फिट इंडिया ॲम्बेसेडर बिजय नायर हे येत्या ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘लोकमत’ महामुंबई महामॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. या महामॅरेथॉननंतरठाणेकर आणि इतर शहरांतील नागरिकही नक्कीच फिटनेसकडे वळतील, असा विश्वासही नायर यांनी व्यक्त केला.
नायर हे स्वत: या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत आणि त्यांनी या सहभागाबद्दल आपला आनंद ‘लोकमत’कडे व्यक्त केला. ते म्हणाले की, ‘लोकमत’ने इतर शहरांतदेखील महामॅरेथॉन आयोजित केली होती. त्यावेळी त्या स्पर्धेला तुफान प्रतिसाद मिळाला होता. आता ही सहावी मॅरेथॉन ठाणे शहरात होत आहे. नक्कीच ही आनंदाची बाब आहे. ‘लोकमत’ने धावपटूंच्या दृष्टिकोनातून चांगला विचार केलाच आहे. आयोजनही चांगले केले आहे. विशेष म्हणजे या महामॅरेथॉनमध्ये अनुभवी आणि नामवंत धावपटू धावणार आहेत. ठाणे शहरातील नागरिक हे फिटनेसप्रेमी आहेत. अनेक स्पर्धा या शहरात होत असतात; परंतु लोकमत समूह आता ही स्पर्धा आयोजित करून अनेक धावपटूंना प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहे. ठाणे शहरासाठी ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर ही स्पर्धा होत असल्याने मोठ्या संख्येने हौशी, अनुभवी धावपटू यात सहभागी होतील, यात शंकाच नाही. त्यामुळे ही मॅरेथॉन यशस्वी होणार आहे. या महामॅरेथॉननंतर लोकमत वर्तमानपत्र आणखी वाचकांपर्यंत पोहोचेल. ५ ते १० किमी अंतरासाठी धावणाऱ्या धावपटूंची स्वत:शी स्पर्धा आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास एका वेगळ्या पातळीवर जाईल आणि ही मॅरेथॉन पूर्ण केल्याचे समाधान त्यांना मिळेल, मॅरेथॉन हा चांगला क्रीडा प्रकार आहे, असा विश्वास नायर यांनी व्यक्त केला. नायर यांनी यापूर्वी १२१ हाफ मॅरेथॉन, ४० फुल मॅरेथॉन, तर द. आफ्रिकेमध्ये ९० किमी अंतराची दौड केली आहे. भारतीय नौदलात आल्यावर त्यांनी १९९९ साली धावण्यास सुरुवात केली. २००९ साली त्यांनी नौदल सेवेतून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांचे वजन १०७ किलो झाले. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ते पुन्हा धावण्याकडे वळले, आता त्यांचे वजन ८४ किलो आहे, धावणे हे एक चांगले औषध आहे, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.