भीतीच्या चक्रीवादळात सापडले ठाणेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 01:08 AM2020-06-04T01:08:08+5:302020-06-04T01:08:15+5:30
सोशल मीडियावर घबराटीच्या सरी : कोरोनाचे भय गेले वाहून
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सोशल मीडिया व मीडियावर मंगळवारपासून पिटण्यात आलेला ‘निसर्ग’ वादळाचा डंका, मुंबई-ठाण्याच्या गाठीशी वादळांचा तुरळक असलेला पूर्वानुभव यामुळे बुधवारी घराबाहेरील वादळाच्या प्रत्यक्ष थैमानापेक्षा ठाणेकरांच्या मनात भीतीचे चक्रीवादळ घोंघावत होते. सायंकाळी ठाणेकरांनी अखेरीस भीती संपल्याबद्दल आणि गेले काही दिवस सहन करीत असलेल्या उन्हाच्या काहिलीतून सुटका झाल्याबद्दल सुस्कारा सोडला.
कोरोनामुळे घरात लॉकडाउन असलेल्या ठाणेकरांना बुधवारपासून मॉर्निंग वॉकला जाण्याची व खुल्या जीममध्ये व्यायामाची मुभा मिळाली होती. परंतु मंगळवारपासून सोशल मीडिया व मीडियावर वादळीची भीती द्विगुणीत करणारे संदेश आल्याने आता या नव्या संकटाने काय वाढून ठेवलेय, अशी भीती ठाणेकरांच्या मनात निर्माण झाली होती. त्यातच अनेक नगरसेवक, आमदार यांनी आपल्या मतदारसंघातील व्हॉटसअॅप ग्रुपवर निसर्ग वादळाचा ताशी वेग १०० ते १२० किमी असणार असल्याने घरीच सुरक्षित राहण्याचा सल्ला देणारे संदेश पाठवले होते. अनेक वाहिन्यांनी वेगवेगळ््या समुद्रकिनाऱ्यांवर उभे केलेले वार्ताहर त्यांच्या पाठीमागे उसळणाºया लाटांपेक्षा अधिक उंच भयाच्या लाटा मनामनात उसळतील अशी खबरदारी घेण्याची वर्णने करीत असल्याने ठाणेकर गारठले.
गेले काही दिवस कोरोनाच्या बातम्या व नकारात्मक मानसिकतेत असलेल्या नागरिकांनी वादळाची भीती घेतली होती. मुंबई, ठाणे परिसराच्या भौगोलिक रचनेमुळे बरेचदा वादळे या परिसराच्या वाट्याला जात नाहीत. मात्र ‘निसर्ग’ वादळ अखेर दुपारी एक वाजता कोकण किनारपट्टीवर धडकले. दुपारी तीन ते पाच या वेळात ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, शहापूर वगैरे भागात सोसाट्याच्या वाºयासह या वादळाने पिंगा घातला. झाडे कोसळणे, घराचे पत्रे उडवून लावणे यापेक्षा जास्त नुकसान या वाºयाने झाले नाही. मात्र ठाणेकरांच्या मनात थैमान घालणारे भीतीचे वादळ हे प्रत्यक्षातील वादळापेक्षा कितीतरी भीषण असल्याने घराबाहेरच्या वादळाने ते विचलीत झाले नाहीत.
स्थलांतरामुळे हानी टळली
च्नवी मुंबईतील खाडी किनारी वास्तव्य करणाºया ६३ नागरिकांचे शाळा क्रमांक ४ येथे तर, मीरा भार्इंदर व उत्तन या भागात समुद्रकिनारी राहणाºया ७०० नागरिकांचे विविध ठिकाणी स्थलांतरित केले.
च्कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतीसह गणेशघाट, खाडी किनारची झोपडपट्टी, वालधुनी आणि नेतवली परिसरातील ५०० नागरिकाना, तसेच ग्रामीण भागातील म्हारळ, वरप, जू गाव आणि कांबा या चार गावातील ४०० जणांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हलवले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. खाडीकिनारी वास्तव्य करणाऱ्यांचे सुरक्षित स्थळी केलेल्या स्थलांतरामुळे मोठी हानी टळली.
भिवंडीतही झाडे पडली
भिवंडी : भिवंडीत मार्कंडेश्वर मंदिर परिसर , नारपोली येथे मोतीबाई तलाव, सालाउद्दीन हायस्कूल, सोहम हॉस्पिटल परिसर तसेच निशान हॉटेल समोर तसेच शाह आदाम रोडवरील पीर बाबा दर्गा, तसेच दिवान शहा दर्गा अशा सात ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. झाडे घरांवर पडल्यामुळे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दुपारनंतर डोंबिवली, कल्याणमध्ये सामसूम
डोंबिवली : चक्रीवादळ व सोसाट्याचा वारा यामुळे पूर्वेत पाच ठिकाणी वृक्ष, झाडाच्या फांद्या पडल्या तर सारस्वत कॉलनीमध्ये एका इमारतीवरील पत्रे उडाले. सकाळच्या वेळी पाऊस असला तरीही जनजीवन सुरळीत होते, दुपारी २ नंतर मात्र रस्त्यावर तुरळक वाहने, वर्दळ दिसून आली. पावसाची संततधार असली तरी शहरात कुठेही पाणी साचल्याने नुकसान झाले नाही. पेडसेंनगर भागात वीज वाहिनीवर झाडाची फांदी पडल्याने काही काळ त्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.