वृक्ष प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका ठाणेकरांना
By अजित मांडके | Published: May 23, 2024 02:24 PM2024-05-23T14:24:01+5:302024-05-23T14:24:46+5:30
वृक्ष छाटणीनंतर फांद्या आजही रस्त्यावर
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका आता ठाणेकरांना बसत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळा तोंडावर आला असतांना आता कुठे महापालिकेने वृक्षांची छाटणी सुरु केली आहे. मात्र दुसरीकडे मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्मळून पडलेले वृक्ष त्यांच्या फांद्या देखील अद्याप हटविण्यात आलेल्या नाहीत. त्यात आता देखील वृक्षांची छाटणी सुरु असतांना त्याच्या फांद्या देखील रस्त्याच्या कडेला पडून आहेत. त्यामुळे वाहन चालकांना याचा त्रास तर होत आहेच, शिवाय यामुळे डासांचे प्रमाण वाढून आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
येत्या काही दिवसात पावसाला सुरवात होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची कामे ३१ मे पर्यंत मार्गी लावण्याचा शासकीय यंत्रणांचा प्रयत्न आहे. त्यात वृक्ष तोडीनंतर किंवा वृक्षांच्या फांद्या छाटणीनंतर त्या तत्काळ उचलल्या जाव्यात असे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी वृक्ष प्राधिकरणाला दिले आहेत. मात्र त्याच्या उलट कारभार वृक्ष प्राधिकरणाकडून सुरु असल्याचे चित्र सध्या ठाण्यात दिसत आहे. त्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ठाण्यात तब्बल ८८ वृक्ष उन्मळून पडले होते. तसेच वृक्षाच्या फांद्या देखील पडल्या होत्या. परंतु आता या घटनेला आठ दिवसाहून अधिकचा काळ लोटला असतांनाही अद्यापही या वृक्षांच्या फांद्या रस्त्याच्या बाजूलाच पडून असल्याचे चित्र शहराच्या विविध भागात दिसत आहे.
ठाणे महापालिकेची यंत्रणा लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने, कामात दिरंगाई झाल्याचा दावा वृक्ष प्राधिकरण विभागाने केला आहे. मात्र आता मनुष्यबळ उपलब्ध झाले असून त्यानुसार काम सुरु करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यातही शहरात धोकादायक स्थितीत किती वृक्ष आहेत, याची माहिती वृक्ष प्राधिकरण विभागाकडे नाही. दरवर्षी पावसाळ्यात महापालिका हद्दीत वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडत असतात. दरवर्षी हा आकडा वाढतांना दिसत आहे. परंतु त्यावर उपाय योजना करण्यात महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग कुचकामी ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.
त्यात अवकाळी पावसाचा फटका ठाणेकरांना बसल्यानंतर आता कुठे वृक्ष प्राधिकरण विभागाने वृक्ष छाटणीची मोहीम हाती घेतली आहे. परंतु वृक्षांच्या फांद्या या रस्त्याच्याच कडेला पडून राहत आहेत. त्याचा त्रास वाहन चालकांना तर होतो आहेच, शिवाय या कचºयाला दुर्गंधी येत असून त्यातून मच्छरांची पैदासही वाढत असून यामुळे आजाराला एकप्रकारे निमंत्रणच देण्याचे काम महापालिका करीत आहे.
या संदर्भात वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी केदार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, आम्हाला या संदर्भात माहिती द्यायला वेळ नाही, वृक्ष कुठे पडले असेल तर सांगा बाकी आम्ही काही सांगू शकत नाही अशी उडवा उडवीची उत्तरे देत आहेत.