खराब रस्त्यांमुळे ठाणेकर गुडघे, पाठदुखीने बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 12:04 AM2020-10-01T00:04:16+5:302020-10-01T00:04:35+5:30
बाराबंगल्यातील रस्त्याला खड्डे : चालणे, धावणे बंद झाल्याने पसरली नाराजी
ठाणे : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जिम बंद असल्यामुळे आरोग्यप्रेमी व्यायामासाठी सकाळ, संध्याकाळ ठाणे पूर्व येथील प्रसिद्ध बारा बंगल्याची वाट धरत असले तरी गेल्या अनेक महिन्यांपासून येथील खराब रस्ते, खड्डे, उखडलेल्या लाद्या. यामुळे येथे व्यायाम करायला येणाऱ्यांना गुडघेदुखी, पाठदुखी यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत ठाणेकरांनी व्यक्त केली आहे.
अनलॉक सुरू झाल्यावर ठाणेकर उपवन, येऊर, बारा बंगला, तलावपाळी, सर्व्हिस रोड तसेच, इतर ठिकाणी सकाळ-संध्याकाळी व्यायामासाठी जात आहेत. लॉकडाऊनमध्ये वाढलेले वजन कमी करणे, रोग प्रतिकारक्षमता वाढविणे, शारीरिक स्वास्थ्य राखणे यांसाठी ते सायकलिंग, जॉगिंग, वॉकिंग करीत आहेत. अनेक वर्षांपासून पूर्व-पश्चिम येथे राहणारे ठाणेकर व्यायामासाठी बारा बंगला येथे येतात. परंतु गेल्या अनेक महिन्यापासून येथील रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून खराब रस्त्यामुळे चालताना अथवा धावताना अडथळे येत आहे. चालताना, धावताना मध्येच पाय मुरगळणे, खड्ड्यात पाय जाणे, सायकलिंग करताना धडपडणे यांसारखे प्रकार घडत आहेत. बारा बंगला येथील रस्ता सुस्थितीत करा, अशी मागणी येथे येणाºया व्यायामप्रेमींनी केली
आहे.
बाराबंगल्यात दररोज वॉकिंगसाठी जात असतो. येथील खराब रस्त्यांकडे ठाणे महापालिकेचे लक्ष वेधण्याकरिता फेब्रुवारी महिन्यात टिष्ट्वट केले होते. मात्र अजून रस्ते खराब आहेत.
- समीर मुंगेकर, ठाणे
बाराबांगला येथील रस्त्याची निविदा निघाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाली नाही. ती मिळाल्यास त्वरित काम सुरू होईल.
- भरत चव्हाण, नगरसेवक
चालणे, धावणे, सायकलिंग करणे या व्यायामासाठी रस्ता चांगला असावा लागतो, अन्यथा शारीरिक इजा होण्याची शक्यता असते.
- विनोद पोळ, जिम प्रशिक्षक
मी रोज चालण्यासाठी तेथे जात असून खराब रस्त्यांमुळे गुडघेदुखी सुरु झाली आहे.
- वैभव मोरेकर, ठाणे
गेल्या महिनाभरापासून तेथे व्यायामासाठी येणाºयांची संख्या वाढली आहे, त्यामुळे त्वरित रस्ता बनवावा.
- सुजित कवे, ठाणे