शक्तिप्रदर्शनाने ठाणेकरांची कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 11:30 PM2019-04-08T23:30:02+5:302019-04-08T23:30:37+5:30
अनेकांचे हाल : अडीच तास अडकले वाहनचालक; पोलीस छावणीचे स्वरूप
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी सोमवारी राष्टÑवादी आणि शिवसेनेच्या वतीने शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यामुळे आधीच वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या ठाणेकरांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. पाचपाखाडी, तलावपाळी, स्टेशन परिसर, मार्केट परिसर, कोर्टनाक्यासह इतर मार्गांवर प्रचंड वाहतूककोंडीचा सामना वाहनचालकांना सहन करावा लागला. कोर्टनाक्याजवळ तर पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
लोकसभा निवडणुकीची धामधूम आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. सोमवारी शिवसेना आणि राष्टÑवादीच्या वतीने उमेदवारी अर्ज भरण्यात आले. यावेळी दोन्ही पक्षांकडून जंगी मिरवणूक काढण्यात आली. परंतु, यामुळे अनेकांचे चांगलेच हाल झाले. वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांचा फौजफाटा ठिकठिकाणी तैनात होता. मात्र, तरीदेखील ठाणेकरांना वाहतूककोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. राष्टÑवादीची मिरवणूक ही पाचपाखाडी येथील पक्ष कार्यालयापासून ११.३० च्या सुमारास सुरूझाली. ती अल्मेडामार्गे पुढे, जांभळीनाका, टेंभीनाकामार्गे सिव्हील रुग्णालय आणि पुढे शासकीय विश्रामगृहाजवळ आली. त्यामुळे येथील सर्वच मार्गांवर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे शिवसेनेची मिरवणूक ही मासुंदा तलावाजवळील कार्यालयापासून निघून, राममारुती रोड, गावदेवी, स्टेशन, मार्केट, तहसीलदार कार्यालय, पुढे कोर्टनाका अशी आली. परंतु, यामुळे कोर्टनाका ते थेट स्टेशनपर्यंत मार्केटमधून जाणारा मार्ग हा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे दुसऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.
राममारुती रोड, गावदेवी हासुद्धा गर्दीचा आणि गजबजलेला भाग असल्याने या ठिकाणीही वाहतूककोंडीची भर पडली होती. त्यामुळे शहरातील मुख्य मार्ग जवळजवळ दोन ते अडीच तास वाहतूककोंडीत अडकले होते. त्यामुळे अनेकांनी वाहनांतून उतरून चालण्याचा पर्याय निवडल्याचेही दिसून आले.
कोर्टनाका येथेच जिल्हाधिकारी कार्यालय असून तेथे अर्ज भरले जाणार असल्याने या भागाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. त्यामुळे येथील दोन्ही मार्ग वाहतूककोंडीने गच्च भरल्याचे दिसून आले. एकूणच दोन ते अडीच तासांनंतर वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
ठाण्यात सात जणांचे अर्ज दाखल
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख उमेदवारांचादेखील समावेश आहे. आतापर्यंत या मतदारसंघात ११ जणांची उमेदवारी दाखल झाली आहे. ९ एप्रिल हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
च्विद्यमान खासदार व शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्यासह काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीचे आनंद परांजपे या प्रमुख उमेदवारांनी सकाळी मुहूर्ताच्या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केले. यात विचारेंनी चार तर परांजपे यांनी तीन अर्ज भरले आहेत. याप्रमाणेच बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे प्रभाकर जाधव,सर्वोदय भारत पार्टीचे ब्रह्मदेव पांडे, भारत जनआधार पार्टीचे अजय गुप्ता, हिंदुस्थान निर्माण दलाचे ओंकारनाथ तिवारी आणि डॉ. अक्षय झोडगे या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केले.