ठाणेकर मुंबईच्या एक पाऊल पुढेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 02:57 AM2018-05-18T02:57:27+5:302018-05-18T02:57:27+5:30
असे कधीही झाले नाही. ठाणेकरांनी मला कोणत्या कामाला बोलवले होते आणि मी आलो नाही. ठाणेकर ज्यावेळी मला बोलतात, त्यावेळी बहुतेकदा ते मुंबईच्या एक पाऊल पुढे असतात, असे कौतुकोद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले.
ठाणे : असे कधीही झाले नाही. ठाणेकरांनी मला कोणत्या कामाला बोलवले होते आणि मी आलो नाही. ठाणेकर ज्यावेळी मला बोलतात, त्यावेळी बहुतेकदा ते मुंबईच्या एक पाऊल पुढे असतात, असे कौतुकोद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. यावेळी ठाकरे यांच्यापासून पालकमंत्र्यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि महापालिका आयुक्तांचे तोंडभरून कौतुक केले.
ठाणे महापालिका आणि क्रस्ना डायग्नोस्टिक्स यांनी पीपीपी तत्वावर कळवा येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ‘सीटी स्कॅन व एमआरआय’ या सेवा रुग्णांसाठी नव्याने माफक दरात उपलब्ध करु न दिल्या आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा ठाकरे यांच्या हस्ते तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, प्रताप सरनाईक, सभागृह नेते नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आदी उपस्थित होते.
हे रुग्णालय पाहून ते पालिकेचे आहे यावर विश्वास बसत नाही. ते सर्वोत्तम व माफकही आहे. ही दोन्ही टोळे जुळणे शक्य नसते. मात्र, ते काम महापालिकेने करून दाखवले. मध्यंतरी, हे रुग्णालय सरकारकडे द्यावे, असे बोलणाऱ्यांनी एकदा तरी ते पाहावे, असा चिमटा त्यांनी विरोधकांना काढला.
‘खासदार चिडतात’
डॉक्टर असलेले खासदार लाभल्याचे आम्ही भाग्य समजतो. त्यांच्यामुळे आरोग्य सेवा- सुविधा सुरू करण्यात यश आले आहे. तसेच वारंवार सुविधा मागितल्यावर मात्र ते चिडतात, असे आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांनी सांगितले.
>‘आयुक्त
भाव खाणारे नाहीत’
ठाणेकरांसाठी या सुविधा सुरू केल्याबद्दल आयुक्त जयस्वाल यांचे ठाकरे यांनी ठाणेकरांच्या वतीने आभार मानले. ते कधीही नाही म्हणत नाहीत. नाहीतर एखादा आयुक्त कामाची नोट पाठवा, असे म्हणतो. मग, ती नोट धूळ खाते आणि आयुक्त भाव खातात. पण हे आयुक्त भाव खाणारे नाहीत, असे कौतुक त्यांनी केले. स्तुती केल्याबद्दल आयुक्तांनी हात जोडले.
>खासदार आणि आयुक्त यांच्यात...
खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यक्रमात कौतुक सुरु असताना, पालकमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात आयुक्त आणि खासदार यांच्यात... अशी सुरूवात केली आणि ते थांबले आणि... मी त्या दोघांमध्ये मध्यस्थी करतो, असे बोलत वाक्य पूर्ण केले. टी. चंद्रशेखर यांच्यानंतर ठाण्याचे आयुक्त जयस्वाल यांनी येथील रस्ते मोठे केले. ते इतके मोठे केले आहेत, की, त्या रस्त्यांवर विमान उतरेल. वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी पालिका मेट्रो आणत आहे. हा प्रकल्प राबवणारी देशातील ती पहिलीच महापालिका ठरेल. त्याचा सर्व्हे सुरु असल्याचे ते म्हणाले.