ठाणेकरांवर ४० ते ५० टक्के पाणी दरवाढीची कुऱ्हाड?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:36 PM2020-02-11T23:36:22+5:302020-02-11T23:36:26+5:30
महासभेत प्रस्ताव : सत्ताधारी शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : टीएमटीच्या भाड्यात पुन्हा वाढ करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरूअसतांना आता दुसरीकडे ठाणे महापालिकेने पाण्याच्या दरात ४० ते ५० टक्यांची वाढ प्रस्तावित करून तसा प्रस्ताव येत्या २० फेबु्रवारी रोजी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. ती यंदाच्या अर्थसंकल्पातही सुचविल्याची माहिती सूत्रांनी दिली. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने यापूर्वी २०१३ मध्ये करवाढ केली होती. त्यानंतर आता ती सुचविली आहे. यामुळे महानगरपालिकेत सत्तेत असलेली शिवसेना यावर काय निर्णय घेते याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
सध्या महापालिका झोपडीधारकांकडून १३० रुपये आकारत असून इमारतधारकांकडून चौरस फुटामागे २०० ते ५०० रुपये या प्रमाणे पाणीबिलाची वसुली सुरू झाली आहे. यापूर्वी महापालिकेने २०१३ मध्ये पाण्याच्या दरात वाढ केली होती. त्यानंतर २०१६ मध्ये इमारतधारकांकडून चौरस फुटामागे पाणी बिलाच्या आकारणीस सुरुवात केली. परंतु, आता या दोन्हीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता झोपडीधारकांच्या पाणीबिलात १३० ऐवजी २०० रुपयांची वाढ प्रस्तावित केली आहे. सध्या पाणीपुरवठा विभागाचा वार्षिक खर्च २५० कोटींच्या आसपास आहे. परंतु, उत्पन्न हे केवळ ११० कोटींच्या घरात आहे. ही तूट ६७ टक्यांच्या आसपास आहे. तसेच पालिका इतर स्त्रोतांकडून घेत असलेल्या पाणी खरेदीचेही दर वाढले आहेत. एकूणच उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने ही दरवाढ प्रस्तावित केली आहे.
एक लाख ३१ हजार ग्राहकांना फटका
महापालिका हद्दीत सध्याच्या घडीला १ लाख २६ हजार ग्राहक असून यामध्ये झोपडी आणि इमारतधारकांचा समावेश आहे. तर वाणिज्य वापराचे ५ हजारांच्या आसपास ग्राहक आहेत. त्यानुसार आता झोपडीधारकांना १३० रुपयांऐवजी २०० रुपये मोजावे लागणार आहेत.
यापूर्वी झोपडीधारकांकडून प्रती १ हजार लीटर मागे ७.५० रुपये मोजावे लागत होते.आता त्यासाठी १३ रुपये मोजावे लागणार आहे. ही दरवाढ ज्या ठिकाणी मीटरप्रमाणे पाणीपुरवठा होतो, त्याठिकाणी आणि ज्या ठिकाणी मीटर प्रमाणे होत नाही, त्याठिकाणीही लागू असणार आहे.
दुसरीकडे इमारतधारकांकडून यापूर्वी ० ते २५० चौरस फुटामागे २०० रुपये तर २५०० चौरस फुटामागे ५०० रुपये आकारले जात होते. आता २०० चौरस फुटामागे ३०० आणि २५०० चौरसफुटामागे ७५० रुपये आकारले जाणार आहेत.