ठाणेकरांना नवीन मीटरचा तुटवडा
By admin | Published: May 3, 2017 05:39 AM2017-05-03T05:39:47+5:302017-05-03T05:39:47+5:30
ठाणे शहरातील महावितरणच्या ग्राहकांना २५ हजार मीटरची गरज असतांना देखील केवळ १२ हजार मीटरच उपलब्ध झाले
ठाणे : ठाणे शहरातील महावितरणच्या ग्राहकांना २५ हजार मीटरची गरज असतांना देखील केवळ १२ हजार मीटरच उपलब्ध झाले असल्याची माहिती समोर आली आहे. महावितरणच्या कार्यालयांमध्ये तुटवडा निर्माण झाल्याने नवीन मीटर बसविणे, जुने मीटर अथवा जळालेले मीटर बदली करावयाचे झाल्यास ग्राहकांना १५ ते २० दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. परंतु, लवकरात लवकर मीटरचाहा तुटवडा भरु न काढण्यात येईल, असा दावा महावितरणने केला आहे.
ठाणे शहरातील महावितरणच्या कोलशेत, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर आदी विभागात नविन मीटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत भारनियमन वाढल्याने मीटर जळण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे. नविन मीटर बसविणे आणि जुने मीटर बदली करणे आदीबाबत अर्ज देण्यासाठी गेल्यावर महावितरणकडून मीटर बसविण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहक वर्गातून नाराजीचा सुर उमटू लागाला आहे. याबाबत, महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, मार्च एन्डींगच्या काळात नवीन मीटर कार्यालयांना प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले होते. तसेच ठाणे महानगर पालिकेने राबविलेल्या रस्ता रूंदिकरण मोहीमेत बाधीत झालेल्या नागरिकांचे वसंत विहार येथील एमएमआरडीएच्या घरांमध्ये पुनर्वसन केल्यामुळे त्या ठिकाणी नविन मीटरची मागणी वाढल्याचेही महावितरणने स्पष्ट केले. शिवाय काही ठिकाणी नागरिकांकडूनदेखील जुने मीटर बदलून नवीन मीटर बसविण्याबाबतही प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यामुळे एकाच वेळेस जास्तीचा लोड आल्याने ग्राहकांना नवीन मीटरसाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी जाणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले.
दरम्यान, ठाणे शहारातील विविध भागात सुमारे २५ हजार नविन मीटर बसविण्यासंदर्भात अर्ज महावितरणला प्राप्त झाले असून त्यापैकी केवळ १२ हजार मीटरच सध्याच्या घडीला प्राप्त झाले असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. तसेच नादुरुस्त मीटरच्या संदर्भातही काहीसा वेळ लागत असल्याचेही सांगण्यात आले आहे. एकूणच एकाच वेळेस एवढी मागणी झाल्याने महावितरणपुढे पेच निर्माण झाला असल्याने नागरिकांच्या त्रासालाही त्यांना सामोरे जावे लागत आहे. (प्रतिनिधी)