चीनमधील विज्ञान प्रदर्शनात ठाणेकर विद्यार्थी अव्वल

By admin | Published: August 28, 2015 11:24 PM2015-08-28T23:24:08+5:302015-08-28T23:24:08+5:30

चीनमध्ये झालेल्या विज्ञान प्रदर्शनात ठाण्यातील आनंदीबाई केशव जोशी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांनी सादर केलेल्या विज्ञान प्रकल्पांना विशेष पारितोषिक जाहीर झाले आहे.

Thanekar Vidyarthi Award for Science exhibition in China | चीनमधील विज्ञान प्रदर्शनात ठाणेकर विद्यार्थी अव्वल

चीनमधील विज्ञान प्रदर्शनात ठाणेकर विद्यार्थी अव्वल

Next

ठाणे : चीनमध्ये झालेल्या विज्ञान प्रदर्शनात ठाण्यातील आनंदीबाई केशव जोशी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांनी सादर केलेल्या विज्ञान प्रकल्पांना विशेष पारितोषिक जाहीर झाले आहे. चीनतर्फे दरवर्षी एक विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते. देशोदेशीचे विद्यार्थी या प्रदर्शनात सहभागी होतात. गेली ९ वर्षे आनंदीबाई केशव जोशी शाळा या प्रदर्शनात सहभागी होत असून या शाळेला प्रदर्शनात सलग ७ वर्षे पारितोषिक मिळाले होते. या शाळेच्या निहार बाम आणि पल्लव खांडेकर या दोन विद्यार्थ्यांनी ‘व्हर्टिकल सक्सेस वाइंड टर्बाइन’ आणि ‘पोर्टेबल मोबाइल चार्जर’ हे दोन प्रकल्प या सादर केले होते. अपारंपरिक ऊर्जेचा वापर ही सध्याची गरज असून या दोन विद्यार्थ्यांनी ही बाब आपल्या प्रकल्पातून मांडली होती.
पवनऊर्जा निर्माण करण्यासाठी त्यांनी दोन उभे पंखे बनवले असून या पंख्यांमुळे वाया जाणाऱ्या वाऱ्याचाही उपयोग करून जास्तीतजास्त ऊर्जा निर्माण करता येते, असे त्यांनी यातून दाखवले. तर, भूकंप अथवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोबाइल चार्जिंग करणे, ही एक मोठी समस्या आहे. पण, त्यांनी तयार केलेल्या उपकरणांमुळे हाताने फिरवून ऊर्जा निर्माण होते आणि मोबाइल चार्ज होतो. साधारणत: मोबाइलच्या मॉडेलप्रमाणे एका मिनिटाला १ टक्का ते २५ टक्के मोबाइल चार्ज होतो, असे त्यांनी आपल्या प्रयोगातून मांडले होते. ऊर्वी गुप्ते आणि तनिष्का लाड या दोघींनी निसर्ग आणि विज्ञानाचा परस्पर संबंध मांडताना निसर्ग हा वैज्ञानिक शोधांचा प्रेरणास्रोत असल्याचे सांगितले. सौरपॅनल सूर्याभिमुख ठेवले जातात. घड्याळात वापरलेली गिअर यंत्रणा आणि गिअर्सची चक्रक्रिया सूर्याच्या दिशेनुसार फिरते. त्यामुळे सौरपॅनलद्वारे जास्तीतजास्त सौरऊर्जा निर्माण करता येते. हे चक्र १८० कोनांत फिरत असल्यामुळे सूर्यापासून जास्त ऊर्जा मिळवता येते. याच ऊर्जेचे विद्युतऊर्जेत रूपांतर केले जाते. त्याचप्रमाणे सौरकुकरमधील अन्न शिजवण्यातही मदत होते, असे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य होते. या प्रकल्पांची चीनमधील प्रदर्शनात विशेष पारितोषिकासाठी निवड झाली आहे. शाळेने या प्रदर्शनात आठव्यांदा पारितोषिक मिळवले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Thanekar Vidyarthi Award for Science exhibition in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.