मुलूंडच्या नवघर पूलावरील ट्रकच्या बिघाडामुळे ठाणेकरांना बसला वाहतूक कोंडीचा फटका
By जितेंद्र कालेकर | Published: August 28, 2023 01:06 PM2023-08-28T13:06:18+5:302023-08-28T13:06:47+5:30
ठाणे ते मुंबई मार्गावर दोन तास खोळंबा: तासाभरासाठी चालकांना मिळाली टोलमुक्ती
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुलूंडच्या नवघर उड्डाण पूलावर नाशिक ते मुंबई पूर्व द्रूतगती मार्गावर एक मोठा मालवाहू ट्रक नादुरुस्त झाल्यामुळे तो या मार्गावरच सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास बंद पडला होता. त्यामुळे सकाळी ऐन कामाला जाण्याच्या वेळी सुमारे दोन तास या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. कोंडी फोडण्यासाठी टोल न घेण्याचे आदेश पोलिस उपायुक्त विनय राठोड यांनी दिल्याने चालकांना काहीसा दिलासा मिळाला. सकाळी १०.३० नंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.
#UPDATE#अपडेट
— Lokmat (@lokmat) August 28, 2023
उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या आदेशानुसार, कोपरी टोल नाक्याच्या अधिकाऱ्यांना टोल नाक्यावरील होणारे ट्रॅफिक जाम लक्षात घेता टोल न घेता तात्काळ पुढे सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सोमवारी आठवडयाचा पहिलाच दिवस असल्याने आधीच कल्याण, ठाणे मार्गाकडून मुंबईकडे जाणाºया वाहनांची मोठी गर्दी तीन हात नाका ते मुलूंड चेक नाक्याकडे झालेली होती. त्यात मुलूंडच्या नवघर पूलावर एक मोठा मालवाहू ट्रक सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास बंद पडला. हा ट्रक नेमका रस्त्याच्या मधोमध बंद पडला होता. त्यामुळे ठाण्यातून मुंबईकडे कामानिमित्त खासगी वाहनांनी जाणारे शेकडो चाकरमनी हे या ट्रकच्या मागे लागलेल्या रांगांमध्ये अडकून पडले होते. सोमवार आठवडयाच्या पहिल्याच दिवशी कामावर उशिर होत असल्याने अनेकांना मन:स्ताप सहन करावा लागला.
मुंबई आणि ठाणे अशा दोन्ही बाजूच्या वाहतूक पोलिसांसह कोपरी आणि नवघर पोलिसांची पथकेही याठिकाणी मदतीला आली होती. मात्र, तरीही मुलूंडपासून ठाण्याकडे तीन हात नाक्यापर्यंत तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एकीकडे हे वाहन हटविण्यासाठी प्रयत्न सुरु असतांनाच कोंडी कमी करण्यासाठी मुंबई आणि ठाण्याच्या वाहतूक पोलिस उपायुक्तांनी टोल नाक्याच्या अधिकाºयांशी चर्चा करुन सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास टोल न घेताच वाहने सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे या वाहन चालकांना दिलासा मिळाला. शिवाय, कोंडी फुटण्यातही मदत झाली. दरम्यान, १० वाजण्याच्या सुमारास अपघातग्रस्त ट्रकही बाजूला करण्यात यश आले. त्यानंतर १०.३० वाजण्याच्या सुमारास ही वाहतूक कोंडी हळूहळू कमी झाली. साधारण ११ वाजेनंतर ही वाहतूक पूर्वपदावर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एक तास मिळाला टोल दिलासा
वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी सकाळी ९.३० ते १०.३० या एक तासाच्या काळात चालकांकडून टोल घेण्यात आला नाही. त्यामुळे या काळात चालकांना तात्पूरती टोलपासून मुक्ती मिळाली होती.