कडाक्याच्या थंडीने ठाणेकर गारठले
By Admin | Published: December 24, 2015 01:42 AM2015-12-24T01:42:27+5:302015-12-24T01:42:27+5:30
झपाट्याने घसरलेले तापमान आणि बोचऱ्या वाऱ्यांमुळे मंगळवारी ठाणेकर गारठले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत तापमान झपाट्याने कमी होत १३ अंश सेल्सियसवर पोचल्याने मंगळवारची रात्र ठाणे
ठाणे : झपाट्याने घसरलेले तापमान आणि बोचऱ्या वाऱ्यांमुळे मंगळवारी ठाणेकर गारठले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत तापमान झपाट्याने कमी होत १३ अंश सेल्सियसवर पोचल्याने मंगळवारची रात्र ठाणे, कल्याण-डोंबिवलीकरांनी कुडकुडत काढली. ग्रामीण भागात तर यापेक्षाही कमी म्हणजे ११ ते १२ अंश सेल्सियस असे कमी तापमान नोंदविले गेले.
गेल्या आठवड्यापासून ठाणे जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवतो आहे. शुक्रवारी १४ अंशांवर पोचलेले तापमान शनिवार-रविवारी थोडे वाढले, पण वातावरणात आल्हाददायक गारवा होता. मंगळवारी मात्र दुपारपासूनच बोचरे वारे वाहू लागल्याने तापमान झपाट्याने कमी झाले. दिवसाच्या तापमानातही घट होऊन ते ३२ ते ३३ अंश सेल्सियसवरून थेट २९ अंशांपर्यंत खाली आले. त्यामुळे शाली, स्वेटर, मफलर, कानटोप्या असा थंडीचा जामानिमा केलेली मंडळी मॉर्निंग वॉकला दिसत होती. रंगीबेरंगी जॅकेट, ब्लेझर्स, स्कार्फमधील तरूणाईही लक्ष वेधून घेत होती.कल्याण-डोंबिवली परिसरातही गेल्या दोन दिवसांच्या गुलाबी थंडीच्या तुलनेने मंगळवारी नागरिकांना कुडकुडणाऱ्या थंडीचा अनुभव घेता आला. तेथील तापमानही १३ अंशांपर्यंत खाली घसरले. शहरांच्या तुलनेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तापमानात तर आणखी घट झाली. भिवंडी, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ-बदलापूरचा परिसर, कल्याण तालुक्याचा ग्रामीण भाग थंडीने आणखी गारठला. तेथील तापमान ११ ते १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले होते.