ठाणेकरांना आठ दिवस मिळणार केवळ निम्मे पाणी; झोनिंग पद्धतीने होणार पाण्याचे नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 04:51 PM2022-03-03T16:51:09+5:302022-03-03T16:51:14+5:30
भातसात तांत्रिक बिघाड
ठाणे : भातसा धरणाच्या दरवाजामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पुढील दोन दिवस ठाणे शहराला ५० टक्के कमी पाणीपुरवठा होणार होता. परंतु, या कामासाठी आता आठ दिवसाचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे सतत आठ दिवस ठाणेकरांचे पाण्यापासून हाल होऊ नयेत यासाठी प्रशासनाने स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत उपलब्ध होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे झोनिंग करून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
भातसा धरणाच्या दरवाजामध्ये तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी किमान आठ दिवसाचा कालावधी लागणार असून, तोपर्यंत ठाणे शहराला ५० टक्के कमी पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून दररोज २०० ऐवजी १०० दशलक्ष लिटर इतकाच पाणीपुरवठा होणार आहे. या योजनेतून ठाणे शहर, घोडबंदर परिसर व कळव्यात पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे ठाणेकरांना उन्हाळ्यात टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
असे आहे ठाणे शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन-
गुरुवारपासून दररोज सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, माजिवाडा, मानपाडा, बाळकुंम, कोळशेत, हिरानंदानी इस्टेट, ढोकाळी, वाघबिळ, ब्रह्मांड, विजयनगरी, गांधीनगर, कासारवडवली, ओवळा, सिद्धांचल, सुरकुरपाडा व उन्नती या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर गुरुवारपासून रात्री ९ ते सकाळी ९ वाजेपर्यंत दररोज इटर्निटी, जॉन्सन, समतानगर, सिद्धेश्वर, दोस्ती, आकृती, कळवा, मुंब्रा, जेल, साकेत, ऋतुपार्क व रुस्तमजी या भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या झोनिंगमुळे बिघाड दुरुस्त होईपर्यंत ठाणेकरांना निम्मा का होईना पाणी देता शक्य होणार आहे. महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत सर्वत्र कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.