ठाणेकरांच्या चिंतेत वाढ २८ दिवसात वाढले १५७९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 02:46 PM2020-05-23T14:46:54+5:302020-05-23T14:47:05+5:30
झोपडपटटी भागातील कोरोना संकट कमी करण्यासाठी महापालिकेने आता नगरसेवकांची मदत घेण्याचे निश्चित केले असून त्यांच्या पदाधिकाºयांना हाताशी घेऊन झोपडपटटी भागात सर्व्हे केला जाणार आहे. तसेच काही ठिकाणी फिव्हर क्लिनीकही सुरु करण्यात आले आहे.
ठाणे : ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून मागील २८ दिवसात ठाणे शहरात तब्बल १५७९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हे सर्व रुग्ण हे झोपडपटटी भागातील असून यामध्ये मुंब्रा, लोकमान्य नगर, वागळे इस्टेट या भागांचा प्रामुख्याने समावेश आहे. झोपडपटटी भागात एकाच कुटुंबात अधिकची माणसे वास्तव्यास असल्याने एकामुळे अनेकांना लागण होत असल्याचे पालिकेने म्हंटले आहे. त्यामुळे आता किसनगर भागात दोन ठिकाणी फीव्हर क्लिनीक सुरु करण्यात आले आहेत. तर खाजगी लॅबकडून येणाऱ्या चुकीच्या अहवालांमुळेही काही ठिकाणी रुग्णांची संख्या वाढतांना दिसली आहे. त्यामुळे आता त्यावर देखील अंकुश बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच झोपडपटटी भागातील नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांची आता फळी तयार करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून कोरोनाला आळा घालण्याचे काम केले जाणार आहे.
ठाणे शहरात शुक्रवारी एकाच दिवसात १९७ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये लोकमान्य सावरकर नगर भागात तब्बल ६९ रुग्णांची नोंद एकाच दिवसात झाली आहे. तर वागळे आणि मुंब्रा आदी भागातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. परंतु गुरुवारी काही अहवाल उशिराने आल्याने आणि खाजगी लॅबच्या विरोधात उचलेल्या पावलामुळे त्यांच्याकडून योग्य असे अहवाल आता येऊ लागले आहेत. त्यामुळेच शुक्रवारचा आकडा हा वाढल्याचे दिसून आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. परंतु मागील २८ दिवसांचा विचार केल्यास या दिवसात तब्बल १५७९ नवे रुग्ण ठाणे शहरात आढळले आहेत. यामध्ये सर्वाधीक रुग्ण हे झोपडपटटी भागातील असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे झोपडपटटी भागातील रुग्णांची संख्या कमी कशा करायची असा पेच आता पालिकेला पडला आहे. परंतु आता लोकमान्य नगर, वागळे इस्टेट या भागात तसेच शहरातील इतर झोपडपटटी भागात त्या त्या भागातील स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात आली आहे. ही फळी आता या पट्यात काम करणार आहे. या पदाधिकाऱ्यांकडून विनाकारण घराबाहेर पडणाºयांवर अंकुश ठेवला जाणार आहे. तसेच ज्या भागात कोरोनाचा रुग्ण आढळले आहेत, तेथील नागरीकांना काही त्रास होत आहे का?, त्यांना काही लक्षणे दिसत आहेत का?, याचाही सर्व्हे त्यांच्या माध्यमातून केला जाणार आहे. तसेच किसनगर भागात रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथे आता दोन फिव्हर क्लिनीक सुरु करण्यात आल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे.
दुसकीकडे किसनगर भागातील एकाला कोरोनाची लागण झाली होती. परंतु पुढे त्याच्या घराचा सर्व्हे केला असता त्याच्या कुटुंबात ४५ नागरीक असल्याची माहिती समोर आली आहे. असाच प्रकार अनेक घरांमध्ये दिसून आला आहे, विशेष म्हणजे येथील घरे ही दाटीवटीने आणि एकमेकांना खेटून असल्याने व सार्वजनिक शौचालयांचा वापर एकत्रितरित्या केला जात असल्याने हे प्रमाण वाढतांना दिसत आहे. त्यामुळे आता येथील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी अशा प्रकारची फळी तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.