ठाणेकरांचा हॅप्पीनेस इंडेक्स वाढवण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 05:25 AM2019-02-21T05:25:44+5:302019-02-21T05:26:07+5:30
शंभर कोटींचा निधी : रस्त्यांच्या बाजूला करणार सुशोभीकरण
ठाणे : महापालिका अर्थसंकल्पात नव्या काही योजना मिळाल्या नसल्या, तरी आयुक्तांनी ठाणेकरांचा हॅप्पीनेस इंडेक्स वाढवण्यासाठी पुन्हा विशेष प्रकल्पांची घोषणा केली आहे. त्यासाठी १०० कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. यामुळे ठाणेकरांचा हॅप्पीनेस इंडेक्स वाढणार की कमी होणार, हे आता काळच ठरवणार आहे.
आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा हॅप्पीनेस इंडेक्सचा विचार केला आहे. त्यानुसार, याद्वारे विविध योजना त्यांनी प्रस्तावित केल्या आहेत. यामध्ये ग्रीन कॅनॉपीच्या माध्यमातून घोडबंदर आणि पोखरण रोडच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर हिरवळ निर्माण करून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. शहरातील विविध उद्यानांमध्ये छोटे प्लॉट्स आॅरगॅनिक शेतीसाठी उद्यान दत्तक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी १.५० कोटी, विद्यार्थी वृक्ष दत्तक उपक्रमांतर्गत विविध शाळांतील विद्यार्थ्यांना वृक्ष दत्तक तत्त्वावर देण्याचे प्रस्तावित असून यासाठी एक कोटी, मिस्ट स्प्रेअंतर्गत धूळप्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याची एक कोटी खर्चून तीनहातनाका, कॅडबरी जंक्शन, माजिवडा, कापूरबावडी, वाघबीळ या चौकात उभारणी करण्यात येणार आहे. मुलांसाठी कला उपक्रम राबवण्यासाठी एक कोटी, फिरते ग्रंथालय ही आधुनिक संकल्पना राबवली जाणार असून यासाठी एक कोटी, आरोग्य नायक योजनेच्या माध्यमातून महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची वर्षातून दोनदा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य प्रगती मोजली जाणार असून यासाठी एक कोटी, उच्च शिक्षण प्रवेश सहायता केंद्र तयार करण्यात येणार असून त्यासाठी चार कोटी, ध्वनिरोधक भिंत ही छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उभारली जाणार असून यासाठी एक कोटी, डिजिटल मेसेज बोर्डसाठी दोन कोटी, नवजात शिशूंसाठी दूध बँक योजना पुढे आली असून या माध्यमातून एक संपूर्ण मानवी दूधपेढी उभारली जाणार आहे, त्यासाठी एक कोटी प्रस्तावित केले आहेत. डिजिटल साक्षरता उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांना स्मार्टफोन वापर आणि इंटरनेट साक्षरतेचे धडे दिले जाणार असून यासाठी दोन कोटी प्रस्तावित केले आहेत.
एक दिवस आयुक्तांसोबत घालवा
एक दिवस आयुक्तांसमवेत या योजनेंतर्गत शहरातील महाविद्यालयीन तरुण व तरुणींना महापालिका प्रशासन कसे काम करते, हा अनुभव घेण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला असून यासाठी २० लाखांची तरतूद केली आहे. ‘डिजी लॉकर’अंतर्गत विविध प्रमाणपत्रे जतन करण्यासाठी एक गिगाबाइटच्या मर्यादेत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी २० लाख,तर लिव्हिंग लॅबद्वारे नागरी विषयांत उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाय शोधले जाणार आहेत. यासाठी दोन कोटी, रंगीत झेब्रा क्रॉसिंगसाठी ५० लाख, कौशल्य विकाससाठी पाच कोटी, अॅडाप्टिव्ह ट्रॅफिक सिस्टीम या यंत्रणेसाठी आठ कोटी निधी प्रस्तावित केला आहे.
वैद्यकीय सुविधांवर भर : वैद्यकीय चिकित्सा केंद्रासाठी दोन कोटी, शाळा व पालक संवादासाठी १.५० कोटी, अंधांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमासाठी दोन कोटी, नवजात शिशू उपचार केंद्रासाठी चार कोटी, मोहल्ला क्लिनिक विकसित करण्यासाठी २० कोटी, औषधी भांडारअंतर्गत नाममात्र दरात औषधे मिळणार असून यासाठी चार कोटी, रक्त कर्करोग उपचारासाठी पाच कोटी, ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय सुविधांसाठी दोन कोटी प्रस्तावित केले आहेत.