दीड दिवसांच्या बाप्पाला ठाणेकरांचा भावपूर्ण निरोप
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 8, 2024 06:56 PM2024-09-08T18:56:53+5:302024-09-08T18:59:39+5:30
०९ विसर्जन घाट, १५ कृत्रिम तलाव, १० मूर्ती स्वीकृती केंद्र आणि ४९ ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था आणि सहा फिरत्या विसर्जन व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली होती.
ठाणे: गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया, पुढच्यावर्षी लवकर या अशा जयघोषात , साश्रुनयनांनी ठाणे शहरातील गणेशभक्तांनी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. रविवारी दीड दिवसांच्या बाप्पांचे वाजत, गाजत उत्साहात, भावपूर्ण वातावरणात विसर्जन केले जात आहे. ठाणे शहरात एकूण १४३०७ गणेशमुर्तींचे विसर्जन होणार आहे. दिवसभर पावसाने कृपादृष्टी केली होती.
शनिवारी वाजत गाजत, ढोल ताशांच्या गजरात, टाळ मृदुगांच्या निनादात लाडक्या बाप्पाचे घऱ्ोघरी आगमन झाले. बच्चे कंपनीला बाप्पाच्या आगमनाचा अत्यानंद झाल्याचे दिसून येत होते. पूजा, आरती, प्रसाद, नाचगाणी, नवीन कपडे यामध्ये ते मस्तच तल्लीन झाल्याचे दिसत होते. रविवारी आपल्या दीड दिवसाच्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार असल्याची हुरहूर त्यांच्या मनात घर करून होती. त्यामुळे त्यांचे मन सुन्न झाल्याचे दिसत होते; साश्रुनयनांनी रविवारी दीड दिवस मुक्कामाला आलेल्या बाप्पांना निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, लाडु मोदक घेऊन या अशा घोषणा जोरजोरात आणि एका तालात बच्चे कंपनी देत होते.
बाप्पा आल्यावर जितका आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर होता तितकेच दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देतानाचे दु:खही चेहऱ्यावर दिसत होते तर दुसरीकडे पुढच्या वर्षी बाप्पाच्या पुनर्रागमनाची ओढ स्पष्ट दिसत होती. ०९ विसर्जन घाट, १५ कृत्रिम तलाव, १० मूर्ती स्वीकृती केंद्र आणि ४९ ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था आणि सहा फिरत्या विसर्जन व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली होती. परिमंडळ १ अंतर्गत खाजगी ३८५० तर परिमंडळ ५ अंतर्गत सार्वजनिक ४ तर खाजगी १०४५३ एशा एकूण १४३०७ गणेशमुर्तींचे विसर्जन रविवारी केले जात आहे. विसर्जन स्थळी पोलीसांचा चोख बंदोबस्त होता तर पालिकेचे कर्मचाऱी देखील तैनात केले होते. निर्माल्य संकलित करण्यासाठीही वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.