मोर्चेकरांमुळे ठाणेकरांची पायपीट; दोन मोर्चांनी अडवली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 01:09 AM2020-02-26T01:09:43+5:302020-02-26T01:10:03+5:30
दोन तासांनंतर झाली वाहतूककोंडीतून सुटका
ठाणे : आधीच कळवा येथे तिसऱ्या उड्डाणपुलाच्या कामामुळे या भागात वाहतूककोंडीचा मनस्ताप ठाणेकरांना सहन करावा लागत असताना, मंगळवारी भाजप आणि श्रमजीवीने काढलेल्या मोर्चामुळे येथील वाहतूक आणखी विस्कळीत झाली. दुपारच्या सत्रात शाळा असल्याने अनेक पालकांवर आपल्या मुलांना घेऊन कळवा ते स्टेशन अशी पायपीट करण्याची वेळ आली. तासन्तास अनेक वाहने कोर्टनाका, कळवानाका, विटावा, खारेगावच्या दिशेने खोळंबून उभी होती. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी १०० हून अधिक पोलीस तैनात होते. मात्र, वाहनांची वर्दळ या जास्त असल्याने कोंडीवर मात करण्यासाठी त्यानांही तारेवरची कसरत करावी लागली.
तीन वर्षांपासून कळवा खाडीवर तिसºया उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहतूककोंडीने वाहन चालक आणि नागरिक हैराण आहेत. त्यातच मंगळवारी आलेल्या दोन मोर्चामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. आधी भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यामुळे कोर्टनाका, कळव्याच्या दिशेने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तो संपत नाही तोच दुपारी १२.३० पासून श्रमजिवीच्या आंदोलनकर्त्यांनी ठाणेकरांची वाट आणखी बिकट केली.
वाहतूककोंडीला कंटाळून अनेकांनी वाहनातून उतरून पायी स्टेशन गाठले. अनेक पालकांनी मुलांना पायीच शाळेत नेले. रुग्णवाहिका, रिक्षा, मोठी वाहने, स्कूल बस आदी या कोंडीत अडकले होते. दोन तासानंतर येथील वाहतूक पूर्वपदावर आली.
वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा
वाहतूककोंडी टाळण्यासाठी या आंदोलनकर्त्यांना साकेतच्या दिशेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोडण्यात येत होते. परंतु, त्यामुळे कळव्याकडे जाणारा मुख्य मार्ग बंद केला होता. त्यानुसार येथून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत होते.
कळव्याहून ठाण्याच्या दिशेने खारेगाव मार्गे वाहतूक वळविली होती. त्यामुळे लांबचा वळसा वाहनचालकांना सहन करावा लागला. या भागात जवळजवळ दोन तासाहून अधिक काळ ठाण्याच्या दिशेने, पोलीस मुख्यालयाच्या दिशेने, विटाव्याच्या दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मोर्चा आल्याने या भागात वाहतूक कोंडी झाली होती. परंतु, ती सोडविण्यासाठी १०० वाहतूक पोलीस सज्ज होते. तसेच वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्यासाठी देखील सांगण्यात आले होते. वाहनांची ये-जा अधिक असल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. परंतु,तो सोडविला.
अमित काळे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे