पाणीकपात रद्द केल्याने ठाणेकरांना दिलासा
By admin | Published: November 4, 2015 11:36 PM2015-11-04T23:36:44+5:302015-11-04T23:36:44+5:30
ऐन दिवाळीच्या आधीच शहरात पाणीकपात लागू झाल्याने याचे पडसाद बुधवारी झालेल्या महासभेतही उमटले. किमान दिवाळीच्या काळात ती रद्द करण्याची मागणी नगरसेवकांनी
ठाणे : ऐन दिवाळीच्या आधीच शहरात पाणीकपात लागू झाल्याने याचे पडसाद बुधवारी झालेल्या महासभेतही उमटले. किमान दिवाळीच्या काळात ती रद्द करण्याची मागणी नगरसेवकांनी केल्यानंतर महापालिकेने स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून होणारी पाणीकपात दिवाळीसाठी रद्द केली आहे. त्यामुळे ठाणेकरांना दिलासा मिळणार आहे. परंतु, एमआयडीसीकडून होणारी पाणीकपात रद्द न झाल्याने त्याचा फटका कळवा, मुंब्रा आणि दिवेकरांना सहन करावा लागणार आहे.
ठाणे महापालिकेने १ नोव्हेंबरपासून स्टेमकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात शहरात रोज १५ टक्के आणि बुधवार आणि शुक्रवारी दिवसभर शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, एमआयडीसीने तब्बल ४८ तास शटडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याने कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील नागरिकांना पाण्यासाठी हाल सहन करावे लागणार आहेत. दरम्यान, पुढील आठवड्यात दिवाळी असल्याने किमान या कालावधीत तरी पाणीकपात करू नये, अशी मागणी नगरसेवकांनी महासभेत केली. त्यानंतर, महापौर संजय मोरे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ही कपात दिवाळीपुरती रद्द केल्याचे जाहीर केले. परंतु, दुसरीकडे एमआयडीसीकडून पाणीकपात रद्द करण्यात येत नसल्याचे स्पष्ट केल्याने कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील नागरिकांना ऐन दिवाळीत पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे.