ठाणेकरांचा दुसरा दिवसही वाहतूककोंडीत, ठेकेदारांमुळे मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 02:36 AM2018-08-12T02:36:18+5:302018-08-12T02:36:33+5:30
ठाणेकरांना शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. सकाळपासूनच घोडबंदर, माजिवडा, कॅडबरी, तीनहातनाका तसेच नाशिककडे जाणाºया वाहतुकीचा वेग मंदावला होता. मुंबईकडे जाणारी वाहतूकही धीम्या गतीने सुरूहोती.
ठाणे - ठाणेकरांना शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. सकाळपासूनच घोडबंदर, माजिवडा, कॅडबरी, तीनहातनाका तसेच नाशिककडे जाणाºया वाहतुकीचा वेग मंदावला होता. मुंबईकडे जाणारी वाहतूकही धीम्या गतीने सुरूहोती. त्यात अवजड वाहनांची भर पडल्याने कोंडीची तीव्रता वाढली. शुक्रवारी एमएसआरडीसीकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते. शनिवारी पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक विभागाला कोणतीही पूर्वसूचना न देता खड्डे बुजवण्याचे काम सुरूकेल्याने कोंडी झाली होती. मात्र, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे शुक्रवारी सांगणाºया वाहतूक पोलिसांनी शनिवारी ते दाखल न करता केवळ नोटिसा बजावल्या, असे सांगितले. वाहतूक पोलिसांच्या या भूमिकेविषयी वाहनचालकांत संताप व्यक्त होत आहे.
शुक्रवारी सकाळीही घोडबंदर आणि कळवा पुलावर वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला होता. सकाळी ८ पासून घोडबंदर पट्ट्यात कोंडीस सुरूवात झाली. माजिवडा, मानपाडापर्यंत ती होती. ठेकेदारांनी सकाळच्या सत्रात खड्डे बुजवण्यास सुरुवात केल्याने कोंडी वाढली. परंतु,शनिवारी सलग दुसºया दिवशी पुन्हा याच मार्गावर वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले. घोडबंदर तसेच तीनहातनाका, नितीन कंपनी, कॅडबरी, माजिवडा, नाशिक रोड, कळवानाका या भागांत वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएने वाहतूक विभागाला कोणतीही पूर्वसूचना न देता खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली. हे काम वाहतूक पोलिसांनी बंद केले होते. परंतु, शनिवारी बांधकाम विभागाच्या ठेकेदारांनीच पुन्हा तीच चूक केली. याची माहिती वाहतूक विभागाला मिळताच, ठेकेदारांना समज देऊन काम बंद केले. रात्री १२ ते पहाटे ६ वाजेपर्यंत खड्डे बुजवण्याचे ठरले असताना दिवसा खड्डे बुजवले जात असल्याबाबत वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी या ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात येतील, असे स्पष्ट केले. शिवाय, जेएनपीटी आणि पालघरवरून येणारी अवजड वाहने ही पिकअवरलाच येत असल्याने त्यामुळेही कोंडी होत आहे. त्यासाठीसुद्धा उपाययोजना केल्या जात आहेत.
रस्त्यांना भले मोठे खड्डे पडल्याने अन्य कारणांबरोबरच याही कारणास्तव मुंबईला येणारी व जाणारी वाहतूक मंदावली आहे. पावसाने उघडीप घेताच खड्डे बुजविण्याची एमएसआरडीसीला घाई झाली आहे. मात्र वाहने इतकी वाढली आहेत की दिवसा खड्डे भरणे हेच कोंडीचे कारण ठरले आहे.
पालकमंत्र्यांविषयी संताप
रस्ते विकास महामंडळाचा कार्यभार ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून त्यांच्या शहरातच या विभागाच्या चुकीमुळे २४ लाख ठाणेकरांसह मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि राज्यातील इतर शहरांतून येणाºया लाखो रहिवाशांना या वाहतूककोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. यात रुग्णांसह वृद्ध प्रवासी आणि वाहनचालकांचाही समावेश आहे.