ठाणेकरांना आजारांची ‘साथ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:27 AM2018-07-27T00:27:04+5:302018-07-27T00:27:57+5:30
डेंग्यूचे १६१ संशयित; दोन महिन्यांत वाढले रुग्ण
ठाणे : पावसाळ्यात सर्वत्र साथरोगांची साथ सुरूहोत असते. ठाणे शहरातही सध्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण कमी असले, तरी इतर आजारांच्या तुलनेत डेंग्यूचे संशयित रुग्ण अधिक आढळले आहेत. गेल्या दोन महिन्यांत मलेरियाचे १०९, अतिसाराचे ४५३, जुलाबाचे ७०, टायफॉइडचे १५ आणि डेंग्यूचे १६१ रु ग्ण आढळले आहेत. लेप्टोस्पायरोसिसचे दोन रुग्ण आढळले असले, तरी स्वाइन फ्लू आणि चिकनगुणियाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. यापैकी १७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
साथीचे आजार आटोक्यात ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. महापालिका हद्दीत मागील दोन महिन्यांत सतत पडणाऱ्या पावसाने साथरोगांचे प्रमाण काही अंशी वाढले आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने काहीशी उसंत घेतली असून ऊन आणि पाऊस असे काहीसे चित्र शहरात आहे. वातावरणातील या बदलामुळे शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढण्याची भीती व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये, म्हणून शहरात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळेच ते आटोक्यात असून त्याचबरोबर एकही रु ग्ण दगावलेला नाही, असा दावा महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.टी. केंद्रे यांनी केला आहे.