जेईई मेन्समध्ये ठाणेकरांचे यश
By Admin | Published: June 19, 2017 04:59 AM2017-06-19T04:59:29+5:302017-06-19T04:59:29+5:30
आयआयटीमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने प्रवेश मिळवून देणाऱ्या कठीण आणि सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आयआयटी-जेईई अॅडव्हान्सचा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आयआयटीमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने प्रवेश मिळवून देणाऱ्या कठीण आणि सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आयआयटी-जेईई अॅडव्हान्सचा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात ठाण्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. यतीन दांडी हा देशात १३५ वा, पार्थ पाटील आरक्षित वर्गातून देशात सहावा, तर रिक्षाचालकाचा मुलगा धनंजय तिवारी देशात १३६४ वा आला आहे.
आयआयटी प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. तिच्या दोन पातळ्या विद्यार्थ्यांना पूर्ण कराव्या लागतात. पहिली परीक्षा म्हणजे जेईई मेन्स. यात जवळपास १२ लाख विद्यार्थी दरवर्षी संपूर्ण भारतातून परीक्षा देतात आणि दुसरी म्हणजे जेईई अॅडव्हान्स्ड. पहिल्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेले टॉप दोन लाख २० हजार विद्यार्थी यास पात्र असतात. जेईई अॅडव्हान्स्ड ही परीक्षा २१ मे रोजी झाली. या परीक्षेत देशातून १५ हजार विद्यार्थी दरवर्षी पास होतात. त्यापैकी यतीन, पार्थ आणि धनंजयने सुवर्णयश मिळवले आहे. पार्थ हा इतर मागासवर्गीय वर्गातून देशात सहावा आला आहे. तो कळवा येथे राहतो. त्याचप्रमाणे खुल्या वर्गातून यतीन हा ठाण्यातून प्रथम आला आहे. त्याचे वडील ठाण्यात डॉक्टर आहेत. सुभाष तिवारी या रिक्षाचालकाचा मुलगा धनंजय तिवारी देशातून १३६४ व्या क्रमांकावर आहे. धनंजयची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने या परीक्षेसाठी कोचिंग क्लास लावणे अशक्य होते. धनंजयची परिस्थिती समजल्यावर त्यांनी कोचिंग क्लासची फी पूर्ण माफ केली. एका वर्षाच्या पूर्ण मेहनतीनंतर आणि सर्व परिस्थितीचा सामना करत धनंजयने हे यश मिळवले असल्याचे आयआयटीयन्स पेस एज्युकेशनचे डायरेक्टर प्रवीण त्यागी यांनी सांगितले. धनंजयचे पुढील शिक्षण प्रायोजकत्वाच्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.