ठाणेकरांना मिळणार विरंगुळ्याचे ठिकाण; स्वस्तात होणार गारेगार प्रवास
By अजित मांडके | Published: March 2, 2023 04:33 PM2023-03-02T16:33:42+5:302023-03-02T16:34:35+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध प्रकल्पाचे लोकार्पण
ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या वॉटर फ्रन्ट अर्थात चौपाटी विकसित करण्याच्या प्रकल्पातील कोपरी, कोलशेत आणि कळवा चौपाटींचे लोकार्पण तसेच ठाणेकरांचा स्वस्तात गारेगार प्रवास व्हावा या उद्देशाने परिवहनमध्ये दाखल झालेल्या २० सीएनजी आणि ११ इलेक्ट्रीक बसचे औपचारीक लोकार्पण तसेच ठाणे स्टेशन भागातील पार्कींगची समस्या सोडविण्यासाठी उभारण्यात आलेल्या गावदेवी भुमीगत पार्कींग प्लाझाही ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पांचे शनिवारी लोकार्पण केले जाणार आहे. तसेच वागळे इस्टेट येथील रोड नं. २२ येथील चौक सुशोभीकरणाचेही लोकार्पण केले जाणार आहे.
मागील पाच वर्षापासून ठाण्यात सात ठिकाणी खाडी किनारा विकास व सुशोभिकरणाअंतर्गत ही कामे सुरु आहेत. मात्र या प्रकल्पातील प्रत्येक चौपाटीला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागल्याचे दिसून आले. त्यानुसार आता पहिल्या टप्यात कोलशेत चौपाटी ०.५० किमी, कोपरी ०.३३ किमी आणि कळवा ०.२६ किमी परिक्षेत्रात असलेल्या चौपाटीचे लोकार्पण केले जाणार आहे. याशिवाय वागळे इस्टेट भागातील रोड नं. २२ येथील चौक सुशोभिकरणाचे लोकार्पणही करण्यात येणार आहे.
या प्रकल्पांच्या ठिकाणी उद्यान, जॉगींग ट्रॅक, वॉक वे, सायकल ट्रॅक, बैठक व्यवस्था, अॅम्पी थिएटर, मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था, खुली व्यायाम शाळा, मनोरंजनात्मक सुविधा, गणेश विसर्जन घाट, खाडी लगत धुप प्रतिबंधक गेबियन वॉल, कुंपण भिंत, प्रसाधनगृहे, वाहनतळ आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
गावदेवी भुमिगत पार्कींग
७०० चौरस मीटरवर भुमीगत पार्कींगचे बांधकाम करण्यात आले आहे. याठिकाणी १३० चार चाकी आणि १२० दुचाकी पार्क करता येणार आहेत. यासाठी २७ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. एकीकडे भुमिगत पार्कींगची सुविधा उपलब्ध करु न दिली जात असतांना दुसरीकडे आता येथील मैदानही पूर्वी प्रमाणे क्रि डा प्रेमींसाठी खुले होणार आहे.
कळवा रुग्णालयातील लेबर वॉर्ड
कळवा रुग्णालयात नव्याने लेबर वॉर्ड व आॅपरेशन थिएटर तयार करण्यात आलेले आहे. याठिकाणी ३२ खाटांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
इलेक्ट्रीक बस सेवेत -
ठाणे परिवहनच्या ताफ्यात टप्याटप्याने इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. त्यानुसार नव्याने दाखल झालेल्या ११ इलेक्ट्रीक आणि २० सीएनजी बस शनिवारी पासून ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. इलेक्ट्रीक बसचे पहिल्या टप्याचे तिकीट १० रुपये असणार आहे.