राम मंदिर उभारणीची कहाणी ठाणेकरांना फाऊंटनच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार
By अजित मांडके | Published: December 4, 2023 05:39 PM2023-12-04T17:39:07+5:302023-12-04T17:39:33+5:30
उपवन परिसरात उभारण्यात येत असलेले म्युझिकल फाउंटनचा आनंद ठाणेकरांना काही दिवसांमध्येच अनुभवयाला मिळणार आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील उपवन तलाव येथे पहिला म्युझिकल लेझर शो उभारला जाणार आहे. बडोदरा आणि नागपूरच्या धर्तीवर ठाण्यात पहिले म्युझिकल फाऊंटन आणि बनारस घाट साकारण्यात येत असून या फाउंटनच्या माध्यमातून ठाणेकरांना आयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राममंदीराच्या उभारणीची ध्वनिचित्रफीत दररोज पाहायला मिळणार आहे. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने हे फाउंटन आणि घाट उभारण्यात येत आहे. यासाठी राज्य शासनाकडून १२ कोटींचा निधी देण्यात आला असून बनारस घाटाचे कामही जवळपास ८० टक्क्यांपेक्षा पूर्ण झाले आहे. फाउंटनच्या माध्यमातून केवळ राम मंदिरांच्या उभारणीची कथाच पाहायला मिळणार नसून तर श्रीस्थानक ते ठाण्याची आतापर्यंत झालेली जडणघडण आणि मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे यावर प्रकाश टाकणारी ध्वनिचित्रफीतही ठाणेकरांना पाहायला मिळणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
उपवन परिसरात उभारण्यात येत असलेले म्युझिकल फाउंटनचा आनंद ठाणेकरांना काही दिवसांमध्येच अनुभवयाला मिळणार आहे. अशाप्रकारचे फाउंटन ही बडोदरा आणि नागपूरला उभारण्यात आले आहे. ठाण्यातही अशाप्रकारचे फाउंटन असावे अशी इच्छा सरनाईक यांची होती. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नाने याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राम मंदिरांची उभारणी, उभारणीमागची पार्श्वभूमी, नेमके मंदिर कशाप्रकारे असणार आहे हे उपवन तलाव परिसरात बसून ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय ठाण्याच्या इतिहास सांगणारी तसेच मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे ठाणेकरांना यामध्ये पाहायला मिळणार आहे. मनोरंजनसोबतच माहिती देण्याच्या उद्देश यामागे असून विशेष म्हणजे मराठी,हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये हा शो दाखवला जाणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.
या दोन्ही कामांच्या तयारी विषयीचा आढावा तसेच मतदार संघातील इतर कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार सरनाईक यांनी सोमवारी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. यामध्ये ही दोन्ही कामे प्रगतीपथावर असून १२ जानेवारी रोजी या दोन्ही कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
बनारस घाटावर होणार महाआरती
उपवन तलाव परिसरात बनारस घाटाचे काम देखील सुरु असून हे काम जवळपास ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत झाले आहे. तर ज्यापद्धतीने बनारस घाटावर रोज महाआरती केली जाते त्याच धर्तीवर ठाण्यात साकारण्यात येत असलेल्या उपवन घाटावर एक दिवस महाआरतीचे आयोजन करण्याचे नियोजित करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.