ठाणेकरांचाही प्रवासात आता होणार डबल डेकर बसने, परिवहन समितीने आयुक्तांना सादर केला अर्थसंकल्प
By अजित मांडके | Published: March 21, 2023 05:48 PM2023-03-21T17:48:22+5:302023-03-21T17:48:34+5:30
परिवहनच्या सेवेत टप्याटप्याने नवीन इलेक्ट्रीक बस प्रवासासाठी उपलब्ध होत आहेत.
ठाणे : परिवहनच्या सेवेत टप्याटप्याने नवीन इलेक्ट्रीक बस प्रवासासाठी उपलब्ध होत आहेत. त्यात आता येत्या काळात नव्या डबल डेकर बस देखील परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. त्यामुळेच मुंबई प्रमाणे ठाणेकरांचा प्रवास देखील येत्या काळात डबल डेकर बसने होणार असल्याचे दिसत आहे. मंगळवारी परिवहन समिती सभापती विलास जोशी यांनी परिवहनचा ५६७ कोटी ९१ लाखांचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी आयुक्तांनी ही माहिती दिली.
काही दिवसांपूर्वी परिवहन सेवेने परिवहन समितीकडे २०२३ - २४ चा ४८७.६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात परिवहन समितीने ८०.२२ कोटींची सुचवत हा अर्थसंकल्प महापालिकेला सादर केला. यात पालिकेकडून वाढीव अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. ठाणे परिवहन सेवेच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी प्रवासी संख्येचा विचार करुन नवीन मार्ग सुरु करणे, त्यांचा विस्तार करणे आदी बाबींचा अतंर्भाव करण्यात आला आहे. त्यात मुंब्रा ते भिवंडी, मिरारोड वाशी या मार्गावर तसेच माजिवड्यापासून भिवंडी, अप्पर लोढा ते ठाणे स्टेशन असे मार्ग नव्याने सुरु करण्यात आले आहेत.
परिवहनच्या ताफ्यातील ८२ कर्मचाºयांना पद्दोन्नती देण्यात आली आहे. तर वाढीव महागाई भत्ता, सातवा वेतन आयोग आदींचा बोजा देखील परिवहनवर पडला आहे. तसेच समाजातील विविध घटनांना दिल्या जाणाºया खर्चाचा देखील बोजा वाढत असल्याचे दिसत आहे. तर वेतनापोटी महापालिकेकडून दरमहा १० कोटी अनुदान प्राप्त होत आहे. परंतु मासिक वेतनाचा सरासरी खर्च हा १२ कोटी होत असल्याचे सांगितले आहे. तसेच परिवहनमधील ११ पदे रिक्त आहेत. ती कसर भरुन काढण्यासाठी त्या पदावर सेवानिवृत्त अधिकाºयांना मानधनावर घ्यावे असेही नमुद करण्यात आले आहे.
तर उत्पन्न वाढीसाठी परिवनहचे आरक्षित भुखंड, बीओटी किंवा अकोमोडेशन रिझर्वेशन तत्वावर बांधकाम करुन भुखंड व्यापारी संकुल म्हणून विकसित करुन त्याद्वारे परिवहनला भाडे मिळू शकते असेही या अर्थसंकल्पात नमुद करण्यात आले आहे. त्यानुसार हे भुखंड विकसित केल्यास परिवहनला पुढील दोन ते तीन वर्षात महापालिकेच्या अनुदानाची गरज भासणार नसल्याचा विश्वास आयुक्त बांगर यांनी व्यक्त केला आहे. तर महापालिकेकडून परिवहन प्रशासनाने पालिकेकडून ४६० कोटी ५४ लाखांचे अनुदान मागितले होते. त्यात परिवहन समितीने वाढ करुन त्यांनी पालिकेकडून ३९४ कोटी १९ लाखांच्या अनुदानाची मागणी केली आहे. परंतु दुसरीकडे पालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पात परिवहनसाठी २३० कोटींच्या अनुदानाची तरतूद करुन परिवहनच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
डबल डेकर बस
मुंबईत यापूर्वी डबल डेकर बस पाहिल्या जात होत्या. परंतु आता ठाणेकरांना या बस पाहता येणार असून त्यातून प्रवासही करता येणार आहे. येत्या काळात परिवहनच्या ताफ्यात डबल डेकर बस घेण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. या बस किती असतील हे स्पष्ट झाले नसले तरी देखील लांब पल्याच्या मार्गावर त्या धावणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.