ठाण्याच्या अक्षया अय्यरने पटकाविले कांस्यपदक
By admin | Published: January 5, 2016 01:24 AM2016-01-05T01:24:00+5:302016-01-05T01:24:00+5:30
७६ व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या श्रद्धा घुलेपाठोपाठ ठाण्याच्या अक्षया अय्यर हिनेदेखील
ठाणे : ७६ व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या श्रद्धा घुलेपाठोपाठ ठाण्याच्या अक्षया अय्यर हिनेदेखील चमकदार कामगिरी करीत कांस्यपदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत श्रद्धाची सर्वोत्कृष्ट अॅथलेट म्हणून निवड करण्यात आली. रविवारी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
२९ डिसेंबरपासून पटियाला येथे सुरू झालेल्या अॅथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. या वेळी झालेल्या २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत अक्षया प्रथमच वरिष्ठ गटातून खेळली. मुंबई विद्यापीठाचे तिने प्रतिनिधित्व केले. २५.२७ सेकंदांत तिने २०० मीटरचे अंतर गाठले. या प्रकारात १३० मुली सहभागी झाल्या होत्या. यापैकी आठ मुलींची अंतिम सामन्यासाठी निवड झाली होती. याच स्पर्धेत चार दिवसांपूर्वी झालेल्या १०० मीटर प्रकारात अक्षया सहाव्या स्थानावर होती. १२.३९ सेकंदांत तिने हे अंतर गाठले. यापूर्वी राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक सुवर्णपदके तिने पटकाविली आहेत. निलेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करीत असून पुढच्या वर्षी ती वरिष्ठ गटातून खेळणार आहे. त्यादृष्टीने तिची तयारी सुरू असल्याचे पाटकर यांनी सांगितले. लांब उडीमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या श्रद्धाची सर्वोत्कृष्ट अॅथलेट म्हणून निवड झाल्याचे रविवारी जाहीर करण्यात आले. (प्रतिनिधी)