ठाण्याच्या डायघर पोलिसांनी एकाच वेळी दाखविले माणूसकी आणि कारवाईचे दर्शन
By जितेंद्र कालेकर | Published: April 2, 2020 07:07 PM2020-04-02T19:07:34+5:302020-04-02T19:16:28+5:30
मंगळवारी गस्तीच्या दरम्यान डायघर पोलिसांच्या व्हॅनचा सायरन वाजल्यानंतर एका फळ विक्रेत्याने घाबरुन पळ काढला. त्याच्या फळांचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी स्वत: त्याची गाडी ढकलून चौकीवर आणली. त्यानंतर कोरोनाची माहिती देऊन तोंडाला लावण्यासाठी मास्क आणि त्याची हातगाडीही परत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: संचारबंदीच्या काळात नागरिकांना हटवितांना पोलिसांना माणूसकीचे भानही ठेवावे लागत आहे. मंगळवारी गस्तीच्या दरम्यान डायघर पोलिसांच्या व्हॅनचा सायरन वाजल्यानंतर एका फळ विक्रेत्याने घाबरुन पळ काढला. त्याच्या फळांचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी स्वत: त्याची गाडी ढकलून चौकीवर आणली. दरम्यान, विनाकारण रस्त्यावर आलेल्या पाच वाहन चालकांविरुद्ध मात्र बुधवारी त्यांनी कारवाई करुन गुन्हे दाखल केले.
शीळफाटा ते पूजा पंजाब हॉटेल महापे रोडवर पोलीस व्हॅनचा सायरन वाजवत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांची ३१ मार्च रोजी गस्त सुरु होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना घरात राहण्याबाबतच्या सूचना त्यांच्याकडून ध्वनीक्षेपकाद्वारे दिल्या जात होत्या. पोलिसांची व्हॅन पाहूनच गर्भगळीत झालेल्या एका फळ विक्रेत्याने मात्र अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश असतांनाही आपला ठेला सोडून तिथून पळ काढला. आपला ठेला घेण्यासाठी तो परत येईल, या अपेक्षेने जाधव यांनी काही वेळ तिथे थांबून त्याची वाट पाहिली. मात्र भीतीने तो आलाच नाही. त्याचे ठेल्यावरील फळ कोणी चोरू नये यासाठी स्वत: जाधव यांनी तो ठेला ढकलत शीळ फाटा पोलीस चौकी येथे नेऊन ठेवला. काही तासांनी हा फळ विक्रेता तरुण घाबरतच या चौकीत येऊन त्यांना भेटला. तेंव्हा त्यास कोरोना विषाणूची माहिती देऊन तोंडावर लावण्यासाठी एक मास्कही देऊन त्याचा ठेला त्यांनी त्याला परत केला. दरम्यान, विनाकारण वाहने रस्त्यावर आणणाºया आरीस खान (२१, डावले, ठाणे), विजय सिंग (२१, रा. डोंबिवली), संदीप रजक (३०, रा. कुर्ला, मुंबई), किशोर आलीमकर (४०, रा. शीळगाव, ठाणे), बालेंद्र मिश्रा (५५, दिघा, नवी मुंबई) आणि दिनेश गुप्ता (३१, रा. दिवा, ठाणे)या वाहन चालकांविरुद्ध १ एप्रिल रोजी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग उपाययोजना कायद्यासह कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी डायघर पोलिसांनी काही दानशूर नागरिकांच्या मदतीने सुमारे ६० मजूरांच्या घरातही आवश्यक वस्तूंचे वाटप केले होते. विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध मात्र कारवाई करण्यात कोणाचीही गय केली जात नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.