ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे निधन, शिवसेनेच्या सत्तेची मुहूर्तमेढ रोवणारा शिलेदार हरपला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 07:39 PM2022-01-14T19:39:33+5:302022-01-14T19:40:52+5:30
Thane News: ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. १९३४ साली जन्मलेले वसंत नारायण उर्फ योगीदास मराठे हे १९५६ सालापासून ठाण्यात राहत होते.
ठाणे - ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. १९३४ साली जन्मलेले वसंत नारायण उर्फ योगीदास मराठे हे १९५६ सालापासून ठाण्यात राहत होते. समाजसेवेची आवड असल्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि त्यानंतर शिवसेनेच्या स्थापने पासूनच त्यांचा शिवसेनेत सहभाग होता. १९६७ सालच्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे ठाणे नगरपालिकेवर त्यांची निवड झाली आणि ते ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष झाले होते. मराठे यांचे वयाच्या ८८ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून ठाण्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दोन वर्ष नगराध्यक्ष आणि सहा वर्ष नगरपालिकेचे सभासद राहिले १९७३ साली शिर्डीच्या साईबाबांनी स्वप्नदर्शन देऊन त्यांचं जीवन बदलून टाकलं. मग त्यांनी राजकारण संन्यास घेऊन धर्मग्रंथांचा अभ्यास सुरू केला होता. वसंत मराठे यांनी १९९९ सालापासून श्रीमद् भगवद्गीतेचा अभ्यास, मनन, चिंतन आणि प्रवचनाच्या माध्यमातून भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार हेच त्यांचं अखेरपर्यंत जीवित कार्य राहिलं.
ठाण्यात शिवसेनेची पहिले सत्ता आली आणि ठाणे नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने सत्ता स्थापन केली. ठाणे नगरपालिकेत पहिला शिवसेनेचा नगराध्यक्ष वसंत मराठे यांच्या रूपाने बसला. सत्तेची पहिली संधी शिवसेनेला ठाणे नगरपालिकेने दिली. यावेळी १३ ऑगस्ट १९६७ ला ठाणे नगरपालिकेची निवडणूक झाली आणि १४ ऑगस्टला लगेच निकाल लागला. एकूण ४० जागांपैकी पैकी १५ अधिकृत आणि ६ पुरस्कृत असे शिवसेनेचे २१ उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे शिवसेना सत्तेवर येण्याचा रस्ता मोकळा झाला होता.या निवडणुकीत जनसंघाचे ८,प्रजासमाजवादीचे ३, अपक्ष ८ उमेदवार निवडून आले. ठाणे नगरपालिकेच्या अध्यक्षपदी वसंत मराठे आणि उपाध्यक्षपदी एड. अरविंद दीक्षित हे निवडून आले. या दोघांच्या सत्कारासाठी स्वतः शिवसेनाप्रमुख उपस्थित राहिले होते. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते सत्तेची पहिली मुहूर्तमेढ रोवणारा शिलेदाराचे हरपला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
महापौरांनी वाहिली आदरांजली
वसंत मराठे यांचे ठाण्यासाठी असलेले योगदान हे निश्चितच आम्हाला यापुढेही प्रेरणादायी राहिल, मी ठाण्याचा प्रथम नागरिक या नात्याने त्यांना ठाणेकरांच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करतो.
- नरेश म्हस्के, महापौर, ठाणे