ठाण्याचे माजी पालिका आयुक्त जंत्रे यांची चौकशी
By admin | Published: November 17, 2015 03:33 AM2015-11-17T03:33:39+5:302015-11-17T03:33:39+5:30
प्रसिद्ध बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त नंदकुमार जंत्रे यांची सोमवारी पोलिसांनी दोन तास चौकशी केली. आता या प्रकरणाची व्याप्ती वाढली
ठाणे : प्रसिद्ध बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त नंदकुमार जंत्रे यांची सोमवारी पोलिसांनी दोन तास चौकशी केली. आता या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून, आजी-माजी नगरसेवकांबरोबरच काही बड्या अधिकाऱ्यांनाही येत्या काळात चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिकेत २००५ ते २००८ या कालावधीत आयुक्तपदी असलेले नंदकुमार जंत्रे यांच्या कार्यकाळात परमार यांच्या कोणत्या बांधकाम प्रकल्पांना परवानग्या देण्यात आल्या? कोणत्या प्रकल्पांच्या परवानग्या नाकारण्यात आल्या? त्या कोणत्या कारणास्तव नाकारल्या? तसेच जंत्रे बंधू सुरेश यांची परमारांच्या पोखरण रोडवरील कॉसमॉस हॉरिझोन या प्रकल्पात भागीदारी आहे. त्या अनुषंगानेही पोलिसांनी चौकशी केली. जंत्रे यांच्या चौकशीची मागणी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केली होती. सहायक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातच सोमवारी हणमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण आणि मुल्ला हे चौघे उपस्थित असताना दुसऱ्या कक्षात जंत्रे यांची चौकशी करण्यात येत होती. येत्या २३ नोव्हेंबरला या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)