ठाण्याचे कामगार रुग्णालयच मरणपंथाला, उपचारासाठी धरावी लागतेय मुंबईची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:58 AM2017-11-06T03:58:28+5:302017-11-06T03:58:30+5:30
आज एका बाजूला शहरात मल्टिस्पेशालिस्ट रूग्णालये उभी राहत असताना गरीब, कामगारांसाठी बांधलेले रूग्णालय मात्र शेवटच्या घटका मोजत आहे.
आज एका बाजूला शहरात मल्टिस्पेशालिस्ट रूग्णालये उभी राहत असताना गरीब, कामगारांसाठी बांधलेले रूग्णालय मात्र शेवटच्या घटका मोजत आहे. या कामगार रूग्णालयासाठी वास्तविक केंद्राकडून निधी मिळूनही सुधारणा झालेली नाही. मग हा निधी गेला कुठे हा खरा प्रश्न आहे. यावर लोकप्रतिनिधीही गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वागळे इस्टेट येथील कामगार राज्य विमा योजना रुग्णालयच (इएसआयएस) मरणासन्न अवस्थेत असून तत्कालीन ५०० बेडच्या या रुग्णालयात आता केवळ १०० बेड उरले आहेत. शस्त्रक्रियेसह अनेक विभागांना टाळे लागले आहे. किरकोळ आजाराला तुटपुंजी औषधे देऊन बोळवण केली जाते. तर गंभीर रुग्णाला मात्र मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. एकीकडे १५ हजाराहून २१ हजार वेतन घेणाºयांना राज्य सरकारने ‘इएसआयएस’च्या कक्षेत आणले आहे. तर दुसरीकडे रुग्णालयच ‘अत्यवस्थ’ असल्यामुळे आधी किमान त्याचा कायापालट करून सुसज्ज रुग्णालय उभारावे, अशी माफक अपेक्षा येथील कामगारांनी व्यक्त केली आहे.
वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट या एकेकाळी आशियातील सर्वात मोठया असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये एक हजाराहून अधिक कारखाने होते. त्याठिकाणी राबणाºया कामगार वर्गाची संख्याही लक्षणीय होती. याच कामगारांसाठी केंद्र सरकारने कामगार राज्य विमा योजना रुग्णालय बांधले. तब्बल २८ एकरच्या परिसरात तळ अधिक पाच मजली रुग्णालयाची भव्य इमारत आहे. तर रुग्णालयासाठी डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्ग तत्काळ उपलब्ध व्हावे यासाठी तिथेच कर्मचाºयांसाठी तळ अधिक चार मजली २७ निवासस्थानांच्या इमारती आहेत. अर्थात, रुग्णालयाला जशी अवकळा आली आहे तशीच या निवासस्थानांचीही स्थिती धोकादायक झाल्याने अवघ्या पाच इमारतींमध्ये आता कर्मचाºयांची निवासस्थाने आहेत.
या रुग्णालयाची पाहणी केली असता अनेक विभागांना दिवसाही टाळे लागलेले होते. क्वचित ओपीडी विभाग, औषधपुरवठा विभाग कसाबसा तग धरून सुरू आहे. हाच काय तो कामगारांना रुग्णालयाचा दिलासा. एका कामगाराचा मुलगा उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्याने आला असता, त्याला तात्पुरती औषधे देऊन त्याची बोळवण केली. अधिक उपचारासाठी मुलुंडच्या कामगार रूग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. असाच सल्ला अनेक कामगार रुग्णांना मुंबईकडे जाण्याचा सल्ला देण्यात येत असल्याने हे रुग्णालय म्हणजे राज्य सरकारने ठाण्यातील कामगारांसाठी एक केवळ औपचारिकता म्हणून ठेवलेली यंत्रणा आहे का? असाही सवाल केला जात आहे.
- जितेंद्र कालेकर, ठाणे