ठाण्यातील ‘जादूचे कपाट’ स्वेटरने भरले ; थंडीत कुडकुडणाऱ्या गरिबांना मदत, अनामिक व्यक्तीचा उपक्रम झाला लोकप्रिय
By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 14, 2023 10:03 AM2023-12-14T10:03:27+5:302023-12-14T10:04:05+5:30
फलकाच्या खाली लाकडी कपाट ठेवले आहे.
प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : येथील डॉ. बेडेकर हॉस्पिटलच्या गल्लीत कुणी अनामिकाने ‘जादूचे कपाट’ ठेवले असून, तुमच्या कपाटातील अतिरिक्त झालेले कपडे थंडीत कुडकुडणाऱ्या गोरगरिबांकरिता या जादूच्या कपाटात ठेवा, असे आवाहन करणारा फलक लावला आहे. ठाणेकर आपल्या घरातील कपडे आणून या कपाटात ठेवतात व गोरगरीब येऊन त्यांच्या गरजेनुसार हे कपडे घेऊन जात आहेत.
ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून ‘जादूचे कपाट’ ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. हे कपाट कोणी ठेवले हे गुपित आहे. डॉ. बेडेकर हॉस्पिटलच्या गल्लीत डोंबिवली नागरी बँकेजवळ जाळीवर एक फलक लावलेला आहे. त्या फलकाच्या खाली लाकडी कपाट ठेवले आहे.
या फलकावर लिहिलेला मजकूर असा की, ‘माझ्या कपाटात गरजेपेक्षा जास्त कपडे होते. म्हणून माझे कपडे मी या जादूच्या कपाटात ठेवले. जेणेकरून ज्याच्याकडे कपडे नाहीत, त्याला माझे कपडे मिळो.’ सामाजिक जाणिवेतून केलेल्या आवाहनाला ठाणेकर प्रतिसाद देत आहेत. ज्यांना गरज आहे ते गोरगरीब कपडे घेऊन जातात, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
थंडीच्या दिवसांत ठाण्यातील पदपथांवर अनेक गोरगरीब पांघरूण न घेता जमिनीवर झोपलेले दिसतात.
लहान मुले उघडी फिरत असतात. त्यांना हे जादूचे कपाट वरदान ठरू शकते.
सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या प्राध्यापिका संज्योत देऊसकर यांनी जादूचे कपाट या उपक्रमाने प्रभावित होऊन कशिश पार्कमध्ये हाच उपक्रम राबविण्याचा मानस फेसबुकवर व्यक्त केला आहे.
थंडीत ठाण्यात वेगवेगळ्या परिसरात जादूची कपाटे दिसू लागतील, अशी अपेक्षा आहे.