ठाण्याच्या महापौरांचा पुन्हा प्रशासनाशी वाद?
By admin | Published: October 5, 2016 02:34 AM2016-10-05T02:34:44+5:302016-10-05T02:34:44+5:30
महापौर आणि पालिका प्रशासनातील आधीचे वाद गाजत असतांनाच त्यात मंगळवारी नव्या वादाची भर पडली. ठाणे कला-क्रीडा महोत्सवाच्या बैठकीवेळी दादोजी कोंडदेव
ठाणे : महापौर आणि पालिका प्रशासनातील आधीचे वाद गाजत असतांनाच त्यात मंगळवारी नव्या वादाची भर पडली. ठाणे कला-क्रीडा महोत्सवाच्या बैठकीवेळी दादोजी कोंडदेव क्रीडागृहात महापौर संजय मोरे आणि माहिती जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्यात निविदा देण्यावरून जोरदार शाब्दिक बाचाबाची झाल्याचे समजते. प्रशासनाची बाजू न पटल्याने महापौरांनी माळवींवर पाण्याची बाटली भिरकवल्याचेही सांगितले जाते. मात्र शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी कशीबशी समजूत काढून हे प्रकरण मिटवले. नंतर या वृत्ताचा महापौर आणि प्रशासनाने इन्कार केला.
मागील महासभेत महापौर संजय मोरे आणि सचिवांतील शाब्दिक बाचाबाचीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. आयुक्त घेत असलेल्या काही निर्णयांमुळेही काही महिन्यांपासून महापौर आणि प्रशासनात खटके उडत आहेत. आयुक्तांच्या बाऊन्सरलाही काही दिवसांपूर्वी महापौरांनी खडे बोल सुनावल्याने प्रशासन आणि महापौरांतील वाद उफाळून आला.
दरम्यान, पुढील महिन्यात ठाण्यात होणाऱ्या कला-क्रीडा महोत्सवाच्या आयोजनानिमित्त मंगळवारी दुपारी दादोजी कोंडदेव क्रीडागृहात बैठक झाली. तिला मराठी रंगभूमीवरील कलाकारही उपस्थित होते. बैठक सुरु असतांना निविदा कोणाला द्यायची, या मुद्द्यावरुन महापौर आणि माळवी यांच्यात वाद झडल्याची माहिती तेथे उपस्थित असलेल्यांनी दिली. ‘सेंकड लोएस्टवाल्यालाच’ हे काम द्या, असा आग्रह महापौरांनी धरला. परंतु नियमानुसार ‘फर्स्ट लोएस्टवाल्यालाच’ हे काम देता येऊ शकते, हा मुद्दा माळवी यांनी लावून धरला. नियमाला धरुनच ही निविदा काढण्यात आली आहे. त्यानुसारच काम केले जाईल, असे माळवी यांना सांगताच त्यांच्यात आणि महापौरांत शाब्दिक बाचाबाची झाली.
हा वाद उफाळून आल्याचे कळताच शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती आणि नरेश म्हस्के यांनी तेथे धाव घेत वाद मिटवला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली जाणार होती. मात्र शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने मध्यस्थी करून माळवी यांची समजूत काढल्याचे समजते.