ठाणेची टीडीसीसी बँक देशात दुस-या तर राज्यात प्रथम क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 03:33 PM2018-01-23T15:33:18+5:302018-01-23T15:41:11+5:30
हैद्राबात येथे नुकताच हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडल्याचे बँक अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. बँकेच्या ठेवींमधील वाढ, कर्ज वाटप, थकबाकीचे प्रमाण, अनुत्पादक कर्जाची टक्केवार, खेळत्या भांडवलमधील वाढ, भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण, स्वनिधी, गंगाजळी आॅडीट वर्ग आदी निकषांस अनुसरून बँकेच्या सुमारे ६० वर्षाच्या कालावधीत बँकेचा प्रथमच देशात व्दितीय तर राज्यात प्रथम क्रमांकाची सर्वोत्कृष्ठ बँक म्हणून गौरव झाला
ठाणे : देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये सर्वोत्कृष्ट कामकाजामध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेला देशात व्दितीय तर राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. यामुळे बँकेला राष्ट्रीय पातळीवरील ‘बँको’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय पातळीवरील सहकार क्षेत्रात महत्त्वाचा समजला जाणारा हा ‘बँको’ पुरस्कार तेलंगणा राज्याचे उपमुख्यमंत्री मोहम्मद मेहमुदअली यांच्या हस्ते टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील माजी अध्यक्ष बाबाजी पाटील, शिवाजी शिंदे, अनिल मुंबईकर यांच्यासह बँकेचे सीईओ भगिरथ भोईर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. हैद्राबात येथे नुकताच हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडल्याचे बँक अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. बँकेच्या ठेवींमधील वाढ, कर्ज वाटप, थकबाकीचे प्रमाण, अनुत्पादक कर्जाची टक्केवार, खेळत्या भांडवलमधील वाढ, भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण, स्वनिधी, गंगाजळी आॅडीट वर्ग आदी निकषांस अनुसरून बँकेच्या सुमारे ६० वर्षाच्या कालावधीत बँकेचा प्रथमच देशात व्दितीय तर राज्यात प्रथम क्रमांकाची सर्वोत्कृष्ठ बँक म्हणून गौरव झाला आहे.
या आधीही बँकेला स्वयंम सहाय्यता बचत गटांसाठी उत्कृष्ट कामाचा विशेष पुरस्कार, विभागीय बचत गट लक्षांक पारितोषिक, नाबार्डव्दारे बँकेचा यथोचित गौरव, महाराष्ट्र स्टेट को आॅप बँक्स असोसिएशनचे विशेष पारितोषिक, तसेच उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान प्रथम क्रमांकाचा बँको अवार्ड आणि आता प्रथमच देशात व्दितीय तर राज्यात प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार टीडीसीसी बँकेला सन्मानपूर्वक बहाल करण्यात आल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. देशातील ३४७ जिल्हा बँकांपैकी या पुरस्काराच्या स्पर्धेत देशभरातील १०० बँका होत्या, असे पाटील म्हणाले.
मार्च अखेरपर्यंत बँकेच्या सुमारे सहा हजार १८ कोटींच्या ठेवे असून कर्ज एक हजार ८८९ कोटींचे होते. याशिवाय कॅपिटल फंड २००.४४ कोटी आहे. बँकेचा एनपीए शुन्य टक्के असून ढोबळ नफा १२१.४९ कोटींचा व निव्वळ नफा २७.५० कोटींचा झाल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. सध्या बँकेकडे ८६१.२३ कोटींचा स्वनिधी असून रिझर्व्ह फंड ११० कोटींचा असून भांडवल पर्याप्तता१४.७७ टक्के असल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले. या आर्थिक पाटबळाच्या जोरावर बँकेने नुकत्याच नवनविन योजना हाती घेऊन शेतकºयांसह बेरोजगारांसाठी आर्थिक पाटबळ जाहीर केले आहे. यामध्ये पर्यटनासाठीच्या कर्जासह ६० लाखांचे व्यवसाईक, गृहनिर्माण संस्थाच्या पुर्नबांधणीसाठी ८५ टक्के कर्ज, सौरऊर्जा प्रणालीसाठी आणि परमीट असलेल्या चालकास रिक्षा खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.