कोरोनामुळे ठाणेकरांची पाणीदरवाढ लांबणीवर, महासभा झाली रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 01:35 AM2020-03-19T01:35:51+5:302020-03-19T01:36:15+5:30
महापालिकेच्या माध्यमातून ठाणेकरांवर पाणीदरवाढीची कु-हाड कोसळणार होती. परंतु, कोरोनामुळे महासभा पुढे ढकलण्यात आल्याने ती लांबणीवर पडली आहे.
ठाणे : कोरोनामुळे प्रभावित झाल्याने अनेकांना त्याचा फटकाही बसला आहे. मात्र, याचा ठाणेकरांना तूर्तास एक फायदाही झाल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या माध्यमातून ठाणेकरांवर पाणीदरवाढीची कु-हाड कोसळणार होती. परंतु, कोरोनामुळे महासभा पुढे ढकलण्यात आल्याने ती लांबणीवर पडली आहे. यामुळे काही दिवस का होईना, या दरवाढीतून सुटका होऊन ठाणेकरांना दिलासा मिळणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील घरगुती तसेच व्यावसायिक पाणीवापराच्या दरात ५० ते ६० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महासभेपुढे अंतिम मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र, वेळेअभावी ती खंडित केली होती. या सभेमध्ये विषयपत्रिकेवरील प्रस्तावांवर चर्चा होऊन त्यावर निर्णय होऊ शकलेला नाही. त्यात पाणीवापराच्या दरवाढीच्या प्रस्तावाचा समावेश आहे. असे असतानाच ठाणे महापालिकेचे प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी गेल्या आठवड्यात सादर केलेल्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाणीवापराच्या दरात वाढ करण्याचे प्रस्तावित केले होते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातील सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवरील पाणीदरवाढीच्या प्रस्तावाचे प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पात उमटल्याचे चित्र होते.
मात्र, मागील महिन्याची आणि या महिन्याचीही महासभा २० मार्च रोजी घेण्याचे प्रस्तावित केले होते. मात्र, ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी कमी करण्याचे आवाहन राज्य शासनाने केल्यामुळे महापालिका प्रशासनाने सर्वच कार्यक्र म रद्द केले असून त्याचबरोबर २० मार्च रोजी आयोजित केलेली महासभा रद्द करून ती पुढे ढकलली आहे. त्यामुळे ठाणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सभेबाबत अनिश्चितता
फेब्रुवारी महिन्यात खंडित झालेली महासभादेखील लांबणीवर पडली असून आता ती केव्हा घेतली जाणार, याबाबत अद्यापही प्रशासनाने निश्चित सांगितले नाही. त्यामुळे कोरोनामुळे का होईना ठाणेकरांवरील पाणीदरवाढ तूर्तास लांबणीवर पडली आहे.