टोरंटविरोधात ठाण्यात बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:39 AM2019-03-06T00:39:41+5:302019-03-06T00:39:42+5:30
कळवा-मुंब्रा परिसरात महाराष्ट्र राज्य वीजवितरण कंपनीकडून विद्युतपुरवठा व वीजबिल वसुलीचे काम सुरू आहे;
ठाणे : कळवा-मुंब्रा परिसरात महाराष्ट्र राज्य वीजवितरण कंपनीकडून विद्युतपुरवठा व वीजबिल वसुलीचे काम सुरू आहे; मात्र आता ही सेवा खाजगीकरणाच्या माध्यमातून टोरंट पॉवर लिमिटेड या कंपनीस देण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे. त्यास येथील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. यास अनुसरून टोरंट हटाव कृती समितीच्या नेतृत्त्वाखाली नागरिकांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.
खाजगीकरणाविरोधात कळवा-मुंब्रा येथील नागरिकांनी टोरंट हटाव कृती समितीची स्थापना ज्येष्ठ कामगार नेते दशरथ पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली केली आहे. त्याव्दारे या समितीच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी प्रशासनास जागे करण्यासाठी बेमुदत साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. कळवा, खारीगांव, पारिसकनगर, विटावा, कळवा (पूर्व), मुंब्रा, कौसा, शीळ, दिवा व दहीसर या भागांत वीज बिल वसुली व वीजवितरण करण्याचे काम टोरंटला देण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यास विविध मार्गांनी कडाडून विरोध करून मंगळवारपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले.
वीज वितरण कंपनीकडे चार लाख १८ हजार एवढी थकबाकी असल्याने ठाणे महापालिकेने त्यांचे कार्यालयही सील केले. परंतु, टोरंट ही खाजगी कंपनी असून या कंपनीकडे भिवंडी महापालिकेची मालमत्ताकरापोटी २८५ कोटी रूपयांची थकबाकी असतानाही ती माफ केल्याचा आरोप दशरथ पाटील यांनी केला आहे.
शासनाच्या या मनमानी विरोधासह टोरंटला येथे कडाडून विरोध करण्यासाठी हटाव कृतीसमितीने हे बेमुदत साखळी उपोषण करून आंदोलन तीव्र केले आहे.