देशातील पहिल्या ठाणे डिजीसिटी प्लॅटर्फामचे मंगळवारी लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 04:47 PM2018-01-22T16:47:04+5:302018-01-22T16:48:51+5:30
देशातील पहिल्या डीजीसिटी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी ठाण्यात पार पडणार आहे. या प्रकल्पामुळे एकाच कार्ड मधून नागरीक ते प्रशासन, प्रशासन ते व्यापारी असे सर्वच एकाच रिंगणात येणार आहेत.
ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या जगातील दुसऱ्या आणि भारतातील पहिल्या डिजीसिटी प्लॅटफॉर्म चे मंगळवारी २३ जानेवारी रोजी शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या निमित्ताने पंतप्रधानाच्या संकल्पनेतील पहिला प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे मंगळवारी दुपारी ४ वाजता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, इस्रायलच्या तेल अवीव जाफा शहराचे महापौर डॉ. रॉन हुलदाय यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर मीनाक्षी्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार आहे. इस्रालयमधील तेल अवीव शहराच्या धर्तीवर डिजीसिटी प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्थापनामध्ये बदल, नागरिकांना प्राथमिक, नागरिक केंद्रीत प्रशासकीय बदल या स्तरावर आमुलाग्र बदल होणार असून सीटीकार्ड, मोबाईल अॅप, संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधता यावा यासाठी शाश्वत दुहेरी मार्गाचा अवलंब करण्यात येणार आहे. तेल अवीव महानगरपालिका आणि फॉक्सबेरी या कंपनीच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये देशातील पहिला प्रकल्प राबविण्यात येत आहे. डीजी ठाणे हे या सर्व घटकांसाठी एक मोठे व्यासपीठ निर्माण होणार असून याचा ठाणे शहराला फायदा होणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने डिजी कार्ड, मोबाईल अॅप बनविण्यात आले असून त्या अॅपच्यामाध्यमातून नागरिक महापालिका सेवांची देयके भरू शकतात, विविध मॉल्स, दुकाने याठिकाणी शॉपिंग करू शकतात. तसेच नागरिकांना याचा जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी विविध व्यावसायिकांची नोंदणी केली असून डिजी ठाणे कार्ड आणि अॅपच्या माध्यमातून नागरिक या नोंदणीकृत आस्थापनांकडून मुल्यवर्धीत सेवांचा लाभ घेता येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रशासन ते नागरिक, व्यावसायिक ते नागरिक आणि नागरिक ते नागरिक असा समन्वय साधण्यात येणार असून महापालिकेच्या सर्व सुविधांचे देयक भरण्यापासून ते शहरातील विविध ठिकाणी खरेदी करण्यासाठी या डीजी कार्डचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा फायदा जसा नागरिकांना मिळणार आहे तसाच तो व्यावसायिकांनाही मिळणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.