ठाण्याला पालघर भोवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 03:12 AM2018-05-23T03:12:35+5:302018-05-23T03:12:35+5:30

शिवसेना-भाजपाचे संबंध ताणलेले : लोकसभा, विधानसभेला युतीतच प्रमुख लढत

Thanhala to roam Thane? | ठाण्याला पालघर भोवणार?

ठाण्याला पालघर भोवणार?

googlenewsNext

ठाणे : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाने खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला ‘विश्वासघातकी’ ठरवल्यानंतर त्याचे पडसाद ठाण्यातील कोपरी पुलाच्या भूमिपूजनात जसे उमटले, तसेच ते ठाणे जिल्ह्यातील यापुढील प्रत्येक निवडणुकीवर पडण्याची शक्यता आहे. या निवडणुकीचा निकाल काहीही लागला, तरी आपले नाक कापण्याच्या शिवसेनेच्या या प्रयत्नाचे उट्टे प्रत्येक निवडणुकीत काढण्याचा प्रयत्न भाजपा करणार असल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांतही या दोन पक्षांतच कडवी लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे तेथे पोटनिवडणूक होते आहे. वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांनाच फोडून शिवसेनेने दिलेली उमेदवारी भाजपाच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांचा विचार करून जरी भाजपाने काँग्रेसमधून फोडलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली असली; तरी भाजपाचे मुंबई-ठाण्यातील विविध नेते, पदाधिकारी, आमदार, नगरसेवक, संघाच्या मुशीतील वनवासी कल्याण आश्रमासारख्या संस्थांनी तेथे तळ ठोकला आहे. शिवसेनेनेही आपल्या नेत्यांची फौज तेथे उतरवली आहे. ठाणे जिल्ह्यातील खासदार, आमदार, नगरसेवकांना एकेका परिसराची जबाबदारी देऊन तेथे मुक्काम ठोकण्याचे आदेश दिल्याने कल्याण-डोंबिवली, मुंबईनंतर हे दोन्ही पक्ष निकराने लढत असल्याचे चित्र उभे राहिले आहे.
नालासोपाऱ्यात सभा घेऊन भाजपाने परंपरागत गुजराती मतांसोबत उत्तर भारतीय मतांसाठी प्रयत्न सुरू केल्याचे दाखवून दिले. वसई-विरार, नालासोपाºयातील बहुजन विकास आघाडीच्या मतांना सुरूंग लावण्यासाठी आणि त्यांच्याविरोधातील पंरपरागत ख्रिस्ती मते मिळवण्यासाठी त्यांच्यावर टीकेची झोड उठवताना त्यांचे विरोधक विवेक पंडित यांच्या श्रमजीवीची ताकद आपल्यासोबत ठेवली आहे. त्यातून वनगा यांच्या आदिवासी मतांत फूट पाडण्याचाही प्रयत्न भाजपाने सुरू केला आहे.
शिवसेनेची सारी भिस्त पालघर, विक्रमगड, वाडा, जव्हारवर आहे. वसई-विरारमध्ये त्यांची पारंपरिक मते असली, तरी त्यात पूर्वीचे उपनेते विवेक पंडित यांचाही वाटा आहे. डहाणूमध्ये शिवसेनेला फारसे स्थान नाही. त्यामुळे ती कमतरता त्यांना अन्य परिसरातून भरून काढावी लागेल किंवा कम्युनिस्ट-मार्क्सवाद्यांना तेथे ताकद देत भाजपाच्या- खास करून संघाच्या परंपरागत मतांना सुरूंग लावावा लागेल. मात्र वसई-विरार, नालसोपारा, पालघर येथे होणाºया मतदानावर, त्यातही तेथील बहुजन विकास आघाडीच्या ताकदीवरच शिवसेनेची गणिते अवलंबून आहेत.
सध्या पालघर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणारे वसई, नालासोपारा, बोईसर हे तीन मतदारसंघ बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात आहेत. पालघर शिवसेनेकडे; तर डहाणू आणि विक्रमगड हे भाजपाच्या ताब्यात आहेत. त्यातही नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने केलेली बेगमी त्यांना लोकसभा पोटनिवडणुकीत उपयोगी पडेल, असा त्यांच्या नेत्यांचा होरा आहे.
लोकसभेच्या यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांत बहुजन विकास आघाडीची मते वाढत पावणेतीन लाखांवर गेली. तेथील भाजपाची मते साधारण सव्वादोन ते अडीच लाखांदरम्यान होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेप्रमाणेच भाजपा, शिवसेना एकत्र होते. तेव्हा चिंतामण वनगा यांना पाच लाख ३३ हजार मते मिळाली. त्यामुळे त्यातील निम्मी ताकद आमची असल्याचा शिवसेनेचा दावा आहे.

ठाण्यात काय घडू शकते?
ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण हे दोन लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहेत. तेथे भाजपाने सक्षम उमेदवारांचा शोध सुरू केला आहे.
ठाणे जिल्ह्याच्या १८ आमदारांपैकी भाजपाकडे आठ, शिवसेनेकडे सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे चार आमदार आहेत. त्यातील शिवसेनेच्या सहाही जागांवर उमेदवार देत भाजपा ठाणे जिल्ह्यावरील शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकते.

Web Title: Thanhala to roam Thane?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.