ठाणेकरांना कस्तुरबा, सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे खेटे कशाला? 'कोरोना' विलगीकरणासाठी ज्युपिटर रुग्णालयाचे दरवाजे खुले करा - मनसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 01:54 PM2020-03-31T13:54:46+5:302020-03-31T14:12:02+5:30
कोरोना' विलगीकरणासाठी ज्युपिटर रुग्णालयाचे दरवाजे खुले करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयुक्तांकडे मागणी केली आहे.
ठाणे, - राज्यभर सुरु असलेल्या कोरोना आजाराचे थैमान आता ठाणे शहरातही स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. या आजाराची लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांना मुंबईच्या कस्तुरबा तसेच सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासह विलगीकरणाकरिता धाव घ्यावी लागत आहे. याउलट ठाण्यातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अशी ओळख असलेल्या ज्युपिटर रुग्णालयातच ही सेवा तात्काळ सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली आहे. ज्युपिटरला ठाणे पालिकेने परवानगी देताना त्यांनी दिलेल्या नोंदणीकृत घोषणापत्रात स्थानिक रुग्णांसाठी १५ टक्के बेड राखीव ठेवण्याचे कबूल केले होते. त्याचधर्तीवर 'कोरोना'च्या रुग्णांना येथे सेवा मिळाल्यास त्यांचे मुंबईच्या रुग्णालयांचे खेटे वाचतील, असे मत मनसेने व्यक्त केले.
ठाणे शहरात आतापर्यंत ११ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून शेकडो रुग्णांना विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यातच शहरातील एका रुग्णाने उपचारासाठी मुलुंड येथील नामांकित रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे ठाण्यातील रुग्णांची ही फरफट थांबण्यासाठी त्यांना ज्युपिटर रुग्णालयातच विलगीकरण तसेच उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केली आहे. पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी कोरोनाबाधितांकरिता खासगी रुग्णालय अधिगृहीत करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात एकूण ४९८ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आठ आणि सिव्हिल रुग्णालयात ८० म्हणजे केवळ ८८ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. याउलट ज्युपिटर रुग्णालयात अद्यावत असून त्यांनी नोंदणीकृत घोषणापत्रात रुग्णालयातील १५ टक्के बेड स्थानिक रुग्णांच्या सेवेसाठी राखीव ठेवणार असे नमूद केले आहे. आयुक्तांनी सुचवलेल्या रुग्णांसाठी वैद्यकीय खर्चाव्यतिरिक्त सवलतीच्या दरात सेवा देण्याची अटही या घोषणापत्रात नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने ज्युपिटर व अन्य खासगी रुग्णालये अशाच पद्धतीने सर्वसामान्य 'कोरोना' रुग्णांसाठी सज्ज करण्याची मागणी संदीप पाचंगे यांनी आयुक्तांना पाठवलेल्या निवदेनाद्वारे केली आहे.