कुटुंबाला दिला वेळ अन् मतदारांचे मानले आभार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:46 AM2018-06-28T00:46:37+5:302018-06-28T00:46:39+5:30
आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत पसरलेल्या मतदारसंघातील दमछाक करणारा प्रचार आणि मनावरील दडपण वाढणारा वाढलेला मतांचा टक्का अशा परिस्थितीचा सामना केलेले
ठाणे : आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत पसरलेल्या मतदारसंघातील दमछाक करणारा प्रचार आणि मनावरील दडपण वाढणारा वाढलेला मतांचा टक्का अशा परिस्थितीचा सामना केलेले कोकण पदवीधर मतदारसंघातील प्रमुख उमेदवार भाजपाचे निरंजन डावखरे यांनी मंगळवारचा दिवस कुटुंबासमवेत घालवला, शिवसेनेच्या संजय मोरे यांनी आपल्याला प्रचारात सहकार्य करणाऱ्यांचे फोन किंवा व्हॉटसअॅपवरुन आभार मानले तर राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला बैठका, भेटीगाठी यामध्ये व्यस्त राहिले. दुसºया दिवशी देखील काही वेळ कुटुंब, कार्यकर्ते आणि मतदान केंद्रावरचा माहोल पाहण्यासाठी उमेदवारांनी धावपळ केली.
आता निकालापर्यंत निश्चिंती आहे. वाढलेल्या मतांचा टक्का कोणाच्या पारड्यात पडणार याची धाकधूक तिन्ही उमेदवारांच्या मनात असली तरी ते दाखवत नाहीत. शिवसेनेचे संजय मोरे यांनी सकाळपासून सर्व खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, शिक्षक, पदवीधर यांना फोन करुन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे तसेच मेसेज करुन आभार मानण्याचा सपाटा लावला. काही ठिकाणी मतदारांच्या भेटी घेऊन मोरे यांनी त्यांचे आभार मानले. ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, तिथे भेट देऊन तेथील तयारीची पाहणी केली आहे. यानंतर उरलेला वेळ कुटुंबासाठी दिल्याचे मोरे यांनी सांगितले. तर बुधवारी मतदान केंद्राचा माहोल पाहण्यासाठी मोरे हे दिवसभर नवीमुंबईतच तळ ठोकून होते.
राष्टÑवादीचे नजीब मुल्ला यांनी बुधवारचा संपूर्ण दिवस हा प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी घालवला. गेले १५ दिवस निवडणुकीची धावपळ असल्याने प्रभागातील नागरीकांच्या समस्या पेंडीग होत्या. काही शैक्षणिक प्रवेश रखडले होते, ते प्रवेश मार्गी लावण्याचे काम केले. बुधवारी बँकेची मिटींग घेऊन गेल्या १५ दिवसात ज्या काही महत्वाच्या फाईल, बँकेच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण कामे या मिटींगच्या माध्यमातून त्यांनी मार्गी लावली. परंतु वाढलेल्या टक्क्याची अजिबात चिंता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपाचे निरंजन डावखरे यांनी निवडणुकीच्या दुसºयाच दिवसापासून ‘बॅक टु बेसीक वर्क’ म्हणत शिक्षकांचे, पदवीधरांचे शिल्लक राहिलेले प्रश्न सोडविण्यासाठी बैठका घेतल्या. मंत्रालयात शिक्षकांच्या बदलीचे काही प्रश्न प्रलंबित आहेत, ते सुध्दा मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात बैठकीला जाणार आहेत. या निवडणुकीत ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार देखील मानण्याचे काम या धावळपळीतून सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंबाला सिनेमा बघायला येता का, अशी विनंती त्यांनी बच्चे कंपनीला केली. परंतु तुम्ही आता फ्री आहात, आमची शाळा आहे, असे त्यांनी सांगितल्याचे डावखरे म्हणाले.