सत्तेच्या आमिषाने ठाण्यातील भाजपाचे बंडोबा झाले थंडोबा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 02:57 AM2019-03-27T02:57:06+5:302019-03-27T02:57:26+5:30

महापालिकेत सत्तेचा वाटा देण्याचे आमिष दाखविल्यानंतर भाजपाचे ठाण्यातील २३ बंडोबा थंड झाले. ठाणे लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन विचारे यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेऊन ठाणे महापालिकेतील २३ नगरसेवकांनी तसे पत्र श्रेष्ठींना दिले होते.

 Thanoba's bundle of power in Thane fell due to power bills | सत्तेच्या आमिषाने ठाण्यातील भाजपाचे बंडोबा झाले थंडोबा

सत्तेच्या आमिषाने ठाण्यातील भाजपाचे बंडोबा झाले थंडोबा

Next

ठाणे : महापालिकेत सत्तेचा वाटा देण्याचे आमिष दाखविल्यानंतर भाजपाचे ठाण्यातील २३ बंडोबा थंड झाले. ठाणे लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन विचारे यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेऊन ठाणे महापालिकेतील २३ नगरसेवकांनी तसे पत्र श्रेष्ठींना दिले होते. मात्र, सत्तेत वाटा देऊ, असे पालकमंत्र्यांनी सांगताच या बंडोबांनी आपल्या तलवारी म्यान करून शिवसेनेचा प्रचार करण्याची ग्वाही दिली. या बदल्यात शिवसेनेनेही मीरा-भार्इंदर महापालिकेत सत्तेत वाटा मागितला आहे.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि रायगडचे भाजपाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी केलेल्या मध्यस्थीनंतर अखेर विचारे विरुद्ध नारायण पवार गटातील वादावर पडदा पडला. विचारे यांच्या ऐवजी दुसरा कोणताही उमेदवार दिल्यास त्यासाठी काम करण्याची तयारी असल्याची भूमिका या २३ नगरसेवकांनी घेतली होती. यामध्ये भाजपाचे गटनेते नारायण पवार, अशोक राऊळ, मिलिंद पाटणकर ही मंडळी आघाडीवर होती. त्यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. त्यानंतर शिवसेना विरुद्ध भाजपा असा वाद ठाणे लोकसभा मतदारसंघात निर्माण झाला होता. त्यामुळे याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो, अशी शक्यता निर्माण झाली होती. अखेर मंगळवारी या वादावर पडदा पडला.
भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात ही समन्वय बैठक पार पडली. शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे, राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे आमदार प्रताप सरनाईक, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, सभागृह नेते नरेश म्हस्के, भाजपाचे गटनेते नारायण पवार, अशोक राऊळ आदींसह इतर पदाधिकारी तेव्हा उपस्थित होते. बैठकीत नाराजांनी ठाणे पालिकेत सत्तेत वाटा मागितला. तो मान्य करीत त्यांची मनधरणी करून एकदिलाने काम करण्याची शपथ देण्यात आली.
आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारापर्यंत कसे पोहोचायचे याची रणनिती ठरविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार सुरुवातीला विधानसभानिहाय मोर्चेबांधणी केली जाणार असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात बैठकांचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर प्रमुख नेत्यांच्या सभा या ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भार्इंदर शहरात घेण्यात येणार असल्याचेही निश्चित करण्यात आले. परंतु त्यांच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत.

नरेंद्र मोदींच्या सभेसाठी प्रयत्न
येत्या २४ एप्रिलला मुंंबईत युतीच्या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. त्यामुळे याच दिवशी ठाणे जिल्ह्यात त्यांची सभा घेण्यासाठी जिल्ह्यातील युतीचे पदाधिकारी आग्रही आहेत. त्यानुसार या सभेची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ती कल्याणच्या फडके मैदानात घेण्याची चाचपणीही सुरूआहे.

छोट्या-मोठ्या तक्रारी होत्या, त्या दूर करण्यात आल्या आहेत. मागील २५ वर्षे शिवसेना, भाजपाची युती आहे, त्यामुळे समन्वयाने यावर तोडगा काढण्यात आला.
- शिवसेना नेते एकनाथ शिंदे,
पालकमंत्री, ठाणे जिल्हा


भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता हा विचारे यांच्यासाठी एकदिलाने काम करणार आहे. काही नाराजी होती, ती दूर करण्याचे आदेश पक्षाने दिले होते. त्यानुसार ती दूर करण्यात आली.
- भाजपा नेते रवींद्र चव्हाण,
पालकमंत्री, रायगड जिल्हा

काही नाराजी होती, परंतु ती काही टोकाची नव्हती. आम्ही मागील कित्येक वर्षे दोन भावांसारखे एकत्र काम करीत आहोत. त्यामुळे आमच्यात तसे टोकाचे मतभेद नव्हते. जे काही होते, ते दूर झालेले आहेत.
- राजन विचारे,
शिवसेना उमेदवार

दोन भावंडामध्ये भांडणे होतात. परंतु, ती आता मिटलेली आहेत. आमच्यात छोटे मोठे मतभेद होते, परंतु, आता पक्षाने आदेश दिल्याने आम्ही पक्षासाठी काम करणार आहोत.
- नारायण पवार, ठामपा गटनेते, भाजपा

मतभेद हे छोटे नव्हते, ते मोठेच होते. परंतु, आता पक्षाने आदेश दिले आहेत, त्यानुसार बैठकीत ज्या काही मुद्द्यांवर चर्चा झाली आहे, त्याची अंमलबजावणी होईल, अशी आशा आहे.
- अशोक राऊळ,
ज्येष्ठ नगरसेवक,
भाजपा

Web Title:  Thanoba's bundle of power in Thane fell due to power bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.