'थापा पैशाने विकणारा माणूस नाही, तो निष्ठावंत'; शिंदेंचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर
By अजित मांडके | Published: September 27, 2022 12:50 PM2022-09-27T12:50:28+5:302022-09-27T12:57:41+5:30
थापा यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर त्यांच्यावर उध्दव ठाकरे गटाने थेट मातोश्रीवरील कुत्रे फिरविणारा आणि लादी पुसणारा अशी टीका करण्यात आली.
ठाणे : बाळासाहेबांची सावली समजले जाणारे चंपासिंग थापा यांनी सोमवारी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर, थापा यांच्यावर उद्धव ठाकरे गटाने मातोश्रीवरील कुत्रे फिरविणारा आणि लादी पुसणारा माणूस अशी टीका करत पैसे घेत त्यांनी प्रवेश केल्याचा आरोप केला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना, थापा हा पैशाने विकणारा माणूस नसून तो निष्ठावंत माणूस आहे. तसेच थापांवरील आरोप हा त्यांचा अपमान आहे. खऱ्या अर्थाने तो नेपाळी समाज आणि नेपाळी माणसाचा अपमान असे म्हणून त्याचा आपण जाहीर निषेध करतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
थापा यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर त्यांच्यावर उध्दव ठाकरे गटाने थेट मातोश्रीवरील कुत्रे फिरविणारा आणि लादी पुसणारा अशी टीका करण्यात आली. तसेच त्याने पैसे घेऊन प्रवेश केला असा आरोपही केला गेला. त्या आरोपाला मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी रात्री उत्तर देताना ते कोणाला नोकर समजले त्याच्यामुळे त्यांची ही परिस्थिती झाली आहे. तसेच थापा हे मध्यंतरी आपणास येऊन भेटले होते. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना नाराजी ही व्यक्त केली होती. तर हा माणूस पैशाने विकणारा नसून तो निष्ठावंत माणूस आहे. तो बाळासाहेबांसोबत अनेक वर्ष होता. बाळासाहेब आणि थापा हे समीकरण अख्खा देशाने पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील आरोप हा खऱ्या अर्थाने नेपाळी माणूस आणि समाजाचा अपमान आहे. त्याचा आपण जाहीर निषेध करतो असे शेवटी मुख्यमंत्री म्हणाले.
लवकरच २० हजारांची पोलीस भरती
नुकताच कॅबिनेटमध्ये पोलीस भरतीबाबत निर्णय घेतला आहे. २० हजार जणांच्या भरतीत मोठया प्रमाणात महिला पोलीस दलात येतील, आणि त्या राज्याचा कायदा व सुव्यवस्था सांभाळतील असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.