हक्काचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी करिष्मासह बिपाशाचा ठाणेकर युवा मतदाराना संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 07:15 PM2018-01-25T19:15:34+5:302018-01-25T19:22:47+5:30
अभिनेत्री करिष्मा कपूर, बिपाशा बसू यांचे गडकरीत आगमन होताच उपस्थित शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आढळून आले. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी मतदारनोंदणी करून घेण्याचा आग्रह त्यांनी या युवायुवतींना केला. प्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे यांनीदेखील ‘मतदारनोंदणी आरंभ हाच राष्ट्रभक्तीचा शुभारंभ’ असे घोषवाक्य दिले.
ठाणे :राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री करिष्मा कपूर व बिपाशा बसू यांनी ‘मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले पाहिजे. तो आपला हक्क आहे’ असे येथील उपस्थित महाविद्यालयीन युवायुवतींकडून वदवून घेऊन मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमाद्वारे केले.
दोन दिवसांपासून ज्यांची उत्सुकता होती, त्या अभिनेत्री करिष्मा कपूर, बिपाशा बसू यांचे गडकरीत आगमन होताच उपस्थित शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आढळून आले. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी मतदारनोंदणी करून घेण्याचा आग्रह त्यांनी या युवायुवतींना केला. प्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे यांनीदेखील ‘मतदारनोंदणी आरंभ हाच राष्ट्रभक्तीचा शुभारंभ’ असे घोषवाक्य दिले. या कार्यक्र मास विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा सैनिक अधिकारी प्रांजळ जाधव आदींची उपस्थिती होती.
राज्यात सर्वाधिक ३३० तृतीयपंथींची (थर्ड जेंडर) मतदार म्हणून ठाणे जिल्ह्यात नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात वर्षभरात दोन लाख ११ हजार नवीन मतदारांची नोंदणी जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आल्याची माहिती गुरुवारी पार पडलेल्या आठव्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या या कार्यक्रमात ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. यावेळी मतदानाचा हक्क बजावणार असल्याची शपथही त्यांनी उपस्थितांना दिली.
ठाणे जिल्ह्यात ५९.२७ लाख मतदार
ठाणे जिल्ह्यात सध्या ५९ लाख २७ हजार सात मतदार आहेत. सेनादलातील मतदारांची नोंदणी आता आॅनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. जिल्ह्यातील दोन हजार १८६ सैनिकांनी मतदारनोंदणी केली आहे. यावर्षी प्रथमच एफड ठएळ पद्धत वापरण्यात आली. या पद्धतीमध्ये मतदारनोंदणी करताना मतदारांची कागदपत्रे स्कॅन करून जतन करून ठेवण्यात येतात. अशी प्रणाली वापरणारा महाराष्ट्र देशात दुस-या क्रमांकावर आहे. या पद्धतीत ठाणे जिल्ह्यात ४३ हजार ६९६ मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी यावेळी दिली. विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनीही मतदानाचे महत्त्व विशद केले.
याप्रसंगी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांचा दृकश्राव्य संदेशदेखील दाखवण्यात आला. याप्रसंगी सहस्रक मतदार, दिव्यांग मतदारांचा सत्कार करण्यात आला. जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय निवडणूकविषयक सामान्यज्ञान स्पर्धेतील विजेत्या मुलांचाही गौरव करण्यात आला. सैन्यदलातील नव्याने मतदार म्हणून नोंदणी झालेल्या मुकेश कांबळे, आर.सी. शर्मा, जयंत गोगटे, जगन्नाथ सिन्नरकर, शिवालीनाथ थोरात यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जीवनगाणी या प्रसाद महाडकर यांच्या वाद्यवृंदाने आणि गायिका सोनाली कर्णिक, मंदार आपटे यांच्या गीतांनी सभागृहात ठेका धरायला लावला. योगेश भिडे यांच्या मतदारांसाठी असलेल्या पथनाट्यानेही वाहवा मिळवली.