"... म्हणून मी ओरिजनल शिवसेनेत आले, ठाकरे गटातील या नेत्यांवर निशाणा"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 10:45 PM2023-06-18T22:45:20+5:302023-06-18T22:47:24+5:30
याप्रसंगी कायंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिंदे गटातील काही नेत्यांवर नाव न घेता टीका केली
मुंबई - शिवसेनेचा वर्धापन दिन शिंदे गट आणि ठाकरे गटाकडूनही साजरा केला जात आहे. मात्र, वर्धापनदिनाच्या आधीच ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मनिषा कायंदे आणि शिशिर शिंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्याची माहिती आहे. त्यापैकी मनिषा कायंदे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या आमदार आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचं स्वागत करत मनोगत व्यक्त करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
याप्रसंगी कायंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिंदे गटातील काही नेत्यांवर नाव न घेता टीका केली. तसेच, गेल्या वर्षभरात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात होत असलेला बदल आणि त्यांच्या कामाची गतीमानताच पाहून आपण एकनाथ शिंदे यांच्या ओरिजनल शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं कायंदे यांनी म्हटलं. केवळ दोषारोप करणं आणि आत्म परिक्षण न करणं की, लोकं पक्ष सोडून का जात आहेत. यापुढेही अनेक लोकं इकडे येतील, कारण त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास आहे, असे म्हणत भविष्यातही ठाकरे गटातून शिंदे गटात महिलांचे प्रवेश होतील, असे सुतोवाचच मनिषा कायंदे यांनी केले.
लोकप्रतिनिधींचा जाहीर पक्षप्रवेश | ठाणेhttps://t.co/FrNPPh5Nxr
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 18, 2023
आपल्याला परफॉर्मन्स पाहिजेल, केवळ सकाळी उठून नुसती थुकरटवाडी बघण्यासाठी लोकं चॅनेल लावत नाहीत. देवी बसली म्हणून आमच्या देवदेवतांचा अपमान करणारे लोकं हिंदुत्त्वाचा शिवसेनेचा चेहरा कसे होतील? असा सवालही मनिषा कायंदे यांनी विचारला. कायंदे यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अप्रत्यक्षपणे नाव न घेता टीका केली.
शिवसेना प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी
दरम्यान, यावरून ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला असून, मनिषा कायंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. आता, ठाकरे गटाकडून मनिषा कायंदे यांची पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. या संदर्भातील पत्रही शिवसेना ठाकरे गटाने जारी केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना, कधीही माफ करणार नाही, असे म्हटले होते. त्यानंतर, आज त्यांच्याच सहीने मनिषा कायंदे यांची पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याचंही त्या पत्रात म्हटले आहे.