टॅक्सी-टेम्पोमध्ये थाटला संसार; रात्र काढली जागून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:11 AM2019-08-06T00:11:26+5:302019-08-06T00:11:38+5:30
गोविंदवाडी बायपास परिसरातील नागरिकांचा पुलावर मुक्काम
- मुरलीधर भवार
कल्याण : पावसाच्या पुरामुळे कल्याण खाडीचे पाणी जसे वाढू लागले, तसे आम्ही सगळे अंगावरच्या कपड्यानिशी घराबाहेर पडलो. गोविंदवाडी बायपास रस्त्यावरील ओळखीच्या व्यक्तीच्या टॅक्सीमध्ये २४ तास जागून काढले आहेत. मात्र, कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून कोणीही मदतीसाठी आले नाही. साधी विचारपूसही केली नाही, अशी व्यथा दुर्गाडी खाडी परिसरातील घरात राहणारे मेहमूद शेख यांनी मांडली.
मुसळधार पावसामुळे कल्याण खाडीने रौद्ररूप धारण केल्याने रविवारी पहाटे ५ वाजता शेख यांच्या घरात पुराचे पाणी शिरू लागले. तेव्हा ते, पत्नी अमिना, मुलगा वकास यांच्यासह गॅस सिलिंडर घेऊन घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांनी थेट गोविंदवाडी बायपास रस्ता गाठला. तेथे मित्र मुनाफ शेख याची टॅक्सी उभी होती. त्या टॅक्सीमध्ये त्यांनी पूर्ण रात्र जागून काढली. साधी विचारपूस करायलाही महापालिकेकडून कोणीही आले नाही. काही संस्थांनी त्यांना बिस्किटे व चहा दिला. त्यावर, त्यांनी रात्र काढली.
खाडी परिसरातील सुमित्रा काऊतकर यांच्याही घरात पाणी शिरल्याने त्यांनी एका टेम्पोत संसार थाटला. गोविंदवाडी बायपास रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोत त्यांनी घरातील मोजकेच साहित्य घेऊन रात्र काढली. पती भगवान, मुलगा आनंद, अमोल आणि प्रिया हेदेखील त्यांच्या सोबत होते. घरकाम करणाऱ्या अरुणा मोरे यांचाही संसार एका टेम्पोतच आहे. घरातील सगळे सामान सोडून त्यांनी टेम्पोचा आधार घेतला. तसेच मोरे यांच्या टेम्पोतच आसिया युसूफ शेख यांनीही जागून रात्र काढली.
७० वर्षीय हुसेन इस्माईल यांची खाडीकिनारी असलेली चहाची टपरी वाहून गेली आहे. रहिवासी नासीर शेख यांनी सांगितले की, महापालिकेने पूरग्रस्तांची पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे बायपास रस्त्यावर उभ्या असलेल्या टॅक्सी-टेम्पोचालकांनी त्यांच्या गाड्या बाधितांना राहण्यासाठी दिल्या आहेत. बाधित झालेल्या जवळपास १५० कुटुंबांनी टॅक्सी-टेम्पोचा आधार घेतला. त्यामुळे त्यांचा जीव बचावला आहे.
म्हशींचा गोठाही रस्त्यावरच
कल्याण खाडी परिसरालगत १५० पेक्षा जास्त गोठे असून, त्यात जवळपास पाच हजार म्हशी आहेत. म्हशींना पुराच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी अनेक गोठामालकांनी त्यांच्या म्हशी गोविंदवाडी बायपास रस्त्याच्या दुभाजकाला बांधल्या. दुभाजकाच्या मधोमध त्यांच्यासाठी चारा टाकण्यात आला होता. म्हशीच्या शेणगोठ्यामुळे रस्त्यावर सगळा राळ पसरला आहे.
वाहतूक सुरू : पुरामुळे दुर्गाडी चौकात रविवारी पाणी भरल्याने दुर्गाडी पुलावरून कल्याण-भिवंडी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. ही वाहतूक सोमवारी सकाळी सुरू करण्यात आली आहे. पावसामुळे रस्त्यांची चाळण तसेच बारीक खडी पसरल्याने रस्ते वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. वाहतूककोंडीचा सामना करीत वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे.