पदपथावर थाटले कार्यालय, कर्मचारी, ग्राहकांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 04:24 AM2019-03-18T04:24:08+5:302019-03-18T04:24:34+5:30

टिटवाळा शहरातील महावितरणच्या शाखा कार्यालयास हक्काची जागा नाही.

 Thattate offices, staffs, customers' halls on the pavement | पदपथावर थाटले कार्यालय, कर्मचारी, ग्राहकांचे हाल

पदपथावर थाटले कार्यालय, कर्मचारी, ग्राहकांचे हाल

Next

- उमेश जाधव
टिटवाळा : शहरातील महावितरणच्या शाखा कार्यालयास हक्काची जागा नाही. त्यामुळे विद्युत उपअभियंता व १७ कर्मचाऱ्यांवर दोन महिन्यांपासून गणेशनगर सोसायटी रोड येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयाबाहेर पदपथावर टेबल टाकून ग्राहकांच्या समस्या सोडवण्याची आणि कार्यालयीन कामकाज करण्याची वेळ आली आहे. ४५ हजारांहून अधिक ग्राहकसंख्या आणि लाखो रुपयांचे उत्पन्न असतानाही महावितरणवर ही वेळ का आली, असा प्रश्न विचारला
जात आहे.
महावितरणचे शहरातील शाखा कार्यालय कित्येक वर्षांपासून गणेश मंदिर रोडलगत डीएनएस बँक परिसरात होते. हे कार्यालय भाड्याच्या जागेत होते. भंगार, कचरा यामुळे तेथे घाणीचे व डासांचे साम्राज्य होते. अनेकदा तेथे विंचू आणि सापही निघाले होते. महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करताना ग्राहकांनी हे कार्यालय लक्ष्य केले होते. त्यावेळी त्याची तोडफोडही करण्यात आली. त्यानंतर, हे कार्यालय रवींद्र आर्केडमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केले होते. मात्र, त्याच्या भाडेकराराची मुदत संपल्याने तेही महावितरणला सोडावे लागले.
दुसरीकडे कल्याणमध्ये असलेले उपकार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय टिटवाळ्यात स्थलांतरित करण्यात आले. हे कार्यालय गणपती मंदिर रोडवरील गणेशनगर सोसायटी रोडकडे सुरू केले आहे. याच कार्यालयाबाहेरील पदपथावर टिटवाळा शाखा कार्यालय थाटले आहे. त्यामुळे अवाजवी बिलांच्या तक्रारी, नवीन मीटर बसवणे, वीजबिल भरणा करणे आदी कामांसाठी येणाऱ्या ग्राहकांनाही भर उन्हात उभे राहावे लागत आहे. उन्हाळा वाढू लागल्याने कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे नवीन कार्यालय कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत सर्व कर्मचारी आहेत. कार्यालयाच्या शोध सुरू असल्याचे कर्मचारी सांगत आहेत.

महावितरणला टिटवाळा शहरातून वीजबिलापोटी मासिक दोन कोटींवर महसूल मिळत आहे. तरीही, त्यांना टिटवाळा शहराला शाखा कार्यालय देता येत नाही. पदपथावर शाखा कार्यालय थाटले आहे, हे योग्य नाही.
- अशोक डोंगरे, ग्राहक, टिटवाळा

उन्हातान्हात आम्हाला आमच्या तक्र ारी देण्यासाठी रस्त्यावर उभे राहावे लागते. ग्राहकांची किती मोठी गैरसोय होते, याकडे महावितरण कंपनी जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.
-प्रभावती पाटील, ग्राहक, टिटवाळा

आम्ही कार्यालयाच्या शोधात आहोत. आवश्यक असलेली जागा मिळत नाही. लवकरच शाखा कार्यालयास जागा उपलब्ध करून देण्यात येईल.
- धीरजकुमार धुवे, उपकार्यकारी अभियंता

Web Title:  Thattate offices, staffs, customers' halls on the pavement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.