ठाणे पालिकेच्या शाळेमध्ये बेशुद्ध पडलेल्या कुणालचा घातपात?; पालकांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 07:16 AM2023-01-13T07:16:30+5:302023-01-13T07:16:50+5:30
शाळेने तत्काळ रुग्णालयात नेल्याचा दावा
ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ६४ मध्ये चौथीतील विद्यार्थी कुणाल शंकर चंदनशिव याचा अचानक बेशुद्ध पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. त्याला एका भांडणातून अज्ञात मुलाने छातीवर बसून गळा दाबल्याचा संशय त्याच्या नातेवाइकांनी कापूरबावडी पोलिसांकडे दिलेल्या जबाबात व्यक्त केला आहे. त्याच्या मृत्यूची चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम सोनवणे यांनी गुरुवारी सांगितले.
कुणालच्या मृत्यूचे नेमके कारण समजल्याशिवाय आणि संबंधितांवर कारवाई झाल्याशिवाय मुलाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातून ताब्यात घेणार नसल्याची भूमिका पालकांनी बुधवारी रात्री घेतली होती. गुरुवारी सकाळी त्याचे शवविच्छेदन झाले. या प्रकरणी नि:पक्षपणे चौकशी केली जाईल, असे आश्वासन कापूरबावडी पोलिसांनी दिले. तसेच ठाणे महापालिकेचे शिक्षणाधिकारी राक्षे यांनीही पालिका स्तरावर चौकशी समिती नेमत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पालकांनीही नरमाईची भूमिका घेत कुणालवर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार केले.
मानपाडा येथील महापालिकेच्या शाळेत दुपारच्या सुमारास कुणाल अचानक बेशुद्ध पडला. तो बेशुद्ध पडल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी आणण्याऐवजी तिथेच वेळ वाया घालवला, असा आरोप नातेवाइकांनी केला होता.
प्रत्यक्षात कुणाल बुधवारी दुपारी ३:२७ च्या सुमारास पडला. त्याला तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात ३:३० वाजता नेल्याचा दावा शिक्षकांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या अधिक तपासातून नेमके कारण समजू शकेल, असे सांगण्यात आले.