जिजाऊवर केलेली कारवाई राजकीय आकसातून
By नितीन पंडित | Published: December 20, 2023 07:00 PM2023-12-20T19:00:15+5:302023-12-20T19:01:46+5:30
भिवंडी वाडा मनोर रस्त्याची एसआयटी चौकशी करायची तर २००८ पासूनची करा-मोनिका पानवे
भिवंडी: भिवंडी वाडा मनोर रस्त्याच्या दुरवस्थेवर आंदोलन करणारे,प्रश्न विचारणारी त्यावर उत्तर देणारे हे एकाच गटाचे असल्याने जिजाऊ कन्स्ट्रक्शन या रस्ते बांधकाम व्यावसायिक ठेकेदार कंपनीवर केलेली कारवाई ही राजकीय आकसातुन केल्याचा आरोप कंपनी भागीदार तथा जिजाऊ सामाजिक संस्थेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा मोनिका पानवे यांनी बुधवारी भिवंडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
१८ डिसेंबर रोजी भिवंडी वाडा मनोर रस्त्याच्या दुरवस्थे सह या भागातील इतर रस्ते अपूर्ण निकृष्ट बनविल्या प्रकरणी स्वाभिमान संघटनेच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले.त्याच वेळी भिवंडी विधानसभेचे आमदार शांताराम मोरे यांनी विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला,त्यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या जिजाऊ कन्स्ट्रक्शन या कंपनीवर काळया यादीत टाकण्याची कारवाई करण्याची घोषणा केली.त्यावर पानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
या रस्त्याची फक्त डागडुजी दुरुस्ती करण्याचे काम जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाला होता. त्याचे काम नियमानुसार केले आहे. परंतु राजकीय हेतूने जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे यांनी सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात केलेल्या निस्वार्थी सेवाकार्यामुळे त्यांना विविध समाज घटकातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने अनेक प्रस्थापितांच्या पाया खालची वाळू सरकू लागल्याने त्यांनी हे बेझुट आरोप केले आहेत असे स्पष्ट करीत येथील खासदार आमदार यांना जे जमले नाही ते काम निलेश सांबरे यांनी करून दाखवल्याने अनेकांच्या राजकीय अस्तित्वाला पणाला लागल्याने त्यांनी हे सर्व घडवून आणल असे मोनिका पानवे यांनी सांगितले.
जर कारवाई करायचीच आहे तर भिवंडी वाडा मनोर रस्ता बनवीत असताना अनेक शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही,त्या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराची ,मानकोली खारबाव कामण या रस्त्याच्या दुरवस्थेची सुध्दा चौकशी करा ,मानकोली खारबाव या रस्त्यावर सुध्दा अनेक अपघाती मृत्य नादुरुस्त रस्त्यांमुळे झाले आहेत तरी त्या रस्त्यावर टोल वसुली सुरू आहे त्याची सुध्दा एस आय टी चौकशी करा असा सवाल शेवटी मोनिका पानवे यांनी उपस्थित केला आहे.